Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहा तास धुवांधार पाऊसाने जलसंकट टळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 15:38 IST

शनिवारी झालेल्या धुवांधार पावसाने पूर्णा नदी आणि परिसरातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा व परिसरातील २० ते २५ गावांसाठी वरदान असलेल्या गिरिजा, पूर्णा नदीला यंदा पावसाळ्यात पहिल्यांदाच पाणी आले असून, दोन वर्षांनंतर पूर्णामाई वाहू लागल्याने ग्रामस्थांतून आनंद व्यक्त केला जात आहे.यंदा मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरण्या सार्थकी झाल्या होत्या. त्यानंतर रिमझिम पावसावर पिके जोमात आली; परंतु परिसरातील नदी, नाले, तलाव, विहिरीदेखील कोरड्याठाक पडल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती.मात्र, शनिवारी सकाळी दमदार पावसाला सुरुवात झाली असून, हा पाऊस तब्बल सहा तास कोसळत होता. त्यामुळे पिकांवरील रोगराई नष्ट होईल. शिवाय दोन वर्षांनंतर पूर्णा नदी तुडुंब भरून वाहू लागली. या नदीला आलेले पाणी अनेक गावांना वरदान ठरणारे आहे.

बंधाऱ्यामुळे तीन किमीपर्यंतची शेती सिंचनाखाली

• पूर्णा नदीकाठावरील २० ते २५ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षापासून नदीला पाणी न आल्याने या सर्व गावावर जलसंकट कोसळले होते; परंतु यंदा नदीला पाणी आल्याने काही प्रमाणात हे संकट कमी झाले आहे.• गेल्या चार वर्षांपासून केदारखेडा येथील फुटलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची यंदा दुरुस्ती झाल्याने या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचणार आहे. त्यामुळे वरच्या भागात तीन किलोमीटरपर्यंतची शेती सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. • दोन वर्षांनंतर पूर्णा नदीच्या पाण्याची झलक पाहण्यासाठी शनिवारी सकाळपासून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

टॅग्स :शेती क्षेत्रपाणीपाणीकपातशेतकरी