धाराशीव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा प्रकल्पातून रविवारी सायंकाळी ६:५० वाजता सहा दरवाजे प्रत्येकी १० सेंटिमीटरने उघडण्यात आले असून, यातून ५७.८६१ घनमीटर प्रतिसेकंद (क्युसेक) वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून रविवारी सायंकाळी ६:५० वाजता निम्न तेरणा प्रकल्पाचे १, १४, ७, ८, ६ व ९ हे सहा द्वार १० सेंटिमीटरने उघडण्यात आले. याद्वारे तेरणा नदीपात्रात ५७.८६१ घमी प्रतिसेकंदाने विसर्ग सोडण्यात आला आहे.
या पाण्याच्या विसर्गामुळे तेरणा नदीकाठच्या गावांना संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. विशेषतः गोठे, घरे, विजेची मोटारी, शेतीपिके, जनावरे आणि अन्य मूल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच लोहारा, उमरगा, औसा, निलंगा तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी, पोलिस पाटील यांच्यामार्फत ही माहिती संबंधित गावांमध्ये पोहोचवण्यात आली आहे.
या विसर्गामुळे नदीपात्रात पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि पशुपालक यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. - के. आर. येणगे, शाखाधिकारी, उपसा सिंचन शाखा.
हेही वाचा : एक एकरात किती रोपे? जाणून घ्या 'या' सूत्राच्या मदतीने शेतातील एकरी रोपांची संख्या