नांदेड जिल्ह्याचा पारा ४२ अंशांच्या पलीकडे गेल्याने अंगाची लाहीलाही होत असली तरी, जलसाठ्यांच्या बाबतीत नांदेडकरांसाठी सुखावह चित्र समोर आले आहे. आभाळातून सूर्यदेव आग ओकत असताना जिल्ह्यातील १३ प्रमुख प्रकल्पांनी मात्र आपली 'पातळी' राखली असून, सध्या या जलाशयांमध्ये २१८.४८ दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणीसाठा उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यंदा विष्णुपूरी आणि निम्न मानारची स्थिती समाधानकारक असून में महिन्याच्या झळांमध्येही जिल्ह्याचे तहान भागेल. जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा तीव्र असून तापमानाने उच्चांक गाठला आहे. अशा स्थितीत पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात होती.
मात्र, गेल्या पावसाळ्यात उशिरापर्यंत झालेल्या दमदार हजेरीचा फायदा आता उन्हाळ्यात मिळत आहे. जिल्ह्यातील मुख्य प्रकल्पांमध्ये मुबलक साठा असल्याने लगतच्या विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी स्थिर राहण्यास मोठी मदत झाली आहे.
प्रामुख्याने नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात आजघडीला ६०.८० टक्के साठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच काळात ही पातळी केवळ २३.२२ टक्क्यांवर आली होती.
दुसरीकडे, निम्न मानार प्रकल्प ७५.२२ दलघमी (१.३८ टीएमसी) साठ्यासह सर्वाधिक सुस्थितीत आहे. या दोन मोठ्या प्रकल्पांसह इतर मध्यम प्रकल्पांनीही आपली 'लाईन लेंथ' कायम राखली आहे.
यंदा जानेवारीपासूनच ऊन जाणवू लागले असले तरी, मध्येच येणारे ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण यंदा कमी राहिले.
यामुळे प्रकल्पांमधील पाणी आटण्याचा वेग मंदावला असून, मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी पुरेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता प्रशासनाने या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात नागरिकांना कोणतीही अडचण भासणार नाही. मात्र सध्या तरी प्रशासनाकडून प्रत्यक्षात ठोस उपाययोजना नाहीत.
३० टक्क्याहून अधिक साठा सध्या उपलब्ध
• नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाच्या १३ प्रकल्पांपैकी २ प्रकल्पांमध्ये सध्या ३० टक्क्यांहून अधिक साठा उपलब्ध आहे, तर उर्वरित ४ प्रकल्पांत त्यापेक्षा कमी साठा आहे.
• हा उपलब्ध साठा मे आणि जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवण्यासाठी पाटबंधारे आणि संबंधित विभागाने आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. काटेकोर नियोजित उपसा केल्यास यंदा जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाच्या लागणार नाहीत.
गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्याची स्थिती सध्या समाधानकारक
• गेल्या वर्षी (२०२५) मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील प्रकल्पांनी तळ गाठला होता, ज्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्या काळात विष्णुपुरी प्रकल्पात केवळ २३.२२ टक्के, निम्न मानारमध्ये ४१.६१ टक्के, तर दिग्रस बंधाऱ्यात अवघा १६.६२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
• त्या तुलनेत यंदाची स्थिती अत्यंत समाधानकारक असून जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.शेजारील जिल्ह्यातील प्रकल्पातही आवश्यक तेवढा पाणीसाठा
शेजारील जिल्ह्यातील प्रकल्पातही आवश्यक तेवढा पाणीसाठा
• नांदेडसोबतच शेजारील परभणी-हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातीलही प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. हिंगोलीच्या सिद्धेश्वर प्रकल्पात गतवर्षी १६.१६ टक्के पाणीसाठा होता.
• यंदा त्यात ४१.९८ टक्के आहे. येलदरी प्रकल्पात ५०.४७ टक्के पाणीसाठा होता. यंदा ५६,७१ टक्के आहे. तर इसापूर प्रकल्पातही ५४.९६ टक्के पाणीसाठा आहे.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद
• नांदेड जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.
• जिल्ह्यात एकूण १२२०.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या १३६.२१ टक्के इतके आहे.
• समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळी वाढण्यास आणि प्रकल्पांमधील साठा टिकवून ठेवण्यास मोठी मदत झाली आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पातील आजरोजी उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती
| प्रकल्पाचे नाव | पाणीसाठा (दलघमी) | आजचा साठा (टक्के) | गत वर्षीचा साठा (%) |
| विष्णुपुरी | ५१.८८ | ६०.८० | २३.२२ |
| निम्न मनार | ७५.२२ | ४८.१२ | ४१.६१ |
| दिग्रस | १७.७१ | २७.७३ | १६.६२ |
| राजाटाकळी | १३.६९ | ५०.७६ | १३.८८ |
| अमदुरा | ११.६७ | ४८.१० | ३६.०३ |
| मंगरूळ | १०.२७ | ४१.०८ | ८.९९ |
| ढालेगाव | ९.७४ | ६२.०० | १८.०० |
| मुदगळ | ८.१६ | ६७.३४ | ४९.५८ |
| दिगडी | ७.४४ | ७१.२६ | ३१.९४ |
| लोणीसावंगी | ६.५७ | २१.९१ | २.६० |
| हिरडपुरी | ३.०० | ३०.९६ | ४.८४ |
| जोगलादेवी | २.१० | २१.०० | ११.१४ |
| मंगरूळ | १.७३ | १६.३७ | ०.२९ |
हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक
Web Summary : Despite soaring temperatures, Nanded's dams hold a comfortable 218 MCM of water, significantly better than last year. Vishnu Puri dam has 60.80% water. Proper planning can ensure sufficient water supply throughout summer, averting potential water scarcity issues for residents.
Web Summary : भीषण गर्मी के बावजूद, नांदेड़ के बांधों में 218 एमसीएम पानी है, जो पिछले साल से काफी बेहतर है। विष्णु पुरी बांध में 60.80% पानी है। उचित योजना से गर्मी भर पानी की आपूर्ति सुनिश्चित की जा सकती है, जिससे निवासियों के लिए पानी की कमी की समस्या से बचा जा सकता है।