Join us
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने येलदरीसह दुधनात जलसाठा वाढला, शेकडो गावांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 11:35 IST

सेलू व परतूर शहरांसह परभणी, जालना जिल्ह्यांतील शेकडो गावांना दिलासा; नदी-ओढ्यांना पूर

परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणात मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसात २ द.ल.घ.मी. पाण्याची आवक पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून असलेल्या निम्न दुधना प्रकल्पात पहिल्याच पावसात तब्बल ११ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. मृतसाठ्यात असलेल्या प्रकल्पात जून महिन्यात पाण्याची आवक सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरात सोमवारी ३६ मि.मी., मंगळवारी सायंकाळी ३० मि.मी. मिळून ६६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. ७ जूनपासून ८२ मि.मी. पाऊस धरण परिसरात झाल्याची नोंद करण्यात आली.

या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सद्य:स्थितीत २१८.१७० द.ल.घ.मी. एवढे पाणी उपलब्ध असून २६.९४ टक्के एवढी आहे.तर रविवारी, सोमवारी जालना जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्पात दोन दिवसांत तब्बल ११ दलघमी पाण्याची आवक दूधना प्रकल्पात झाली आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभरात शहरासह जिल्ह्यात कोठेही पाऊस झाला नाही. 

पेरणीयोग्य पाऊस नाही

नांदेड जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून, काही भागांत पाऊस होत आहे. बुधवारी सरासरी ३.८ मिमी पाऊस झाला. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकयांनी जोमाने पेरणीपूर्व कामे उरकून घेतली आहेत. मागच्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. अजूनही सर्वदूर मोठा पाऊस झाला नाही. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत सरासरी ३.८ मिमी पाऊस झाला. हिमायतनगर तालुक्यामध्ये सर्वाधिक १५.१ मिमी, तर अर्धापूर तालुक्यात १३.९ मिमी आणि भोकर तालुक्यात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पेरणीयोग्य पाऊस अद्याप जिल्ह्यात झाला नाही.

३ दिवस बॅटिंगनंतर पावसाची उघडीप

बीड : मागील तीन दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसणाऱ्या पावसाने बुधवारी उघडीप दिली. आता वापसा होताच शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. १ ते १२ जून या कालावधीत वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत १९.९ मिमी पाऊस आला आहे. बुधवारी मागील २४ तासात बीड तालुक्यात २.२ मिमी, पाटोदा ४.७, आष्टी १८.०, गेवराई २.४. माजलगाव ६.१. अंबाजोगाई ६.५. केज ४.८, परळी ०.९, धारूर २.२, वडवणी ८.८ आणि शिरुर कासार तालुक्यात २ मिमी असा एकूण ५. २ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत ११२.७ मिमी एकूण पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद गेवराई तालुक्यात १५९.८ मिमी इतकी झाली आहे.

जिल्ह्यात सरासरी १२.९ मिमी पावसाची नोंद

लातूर: १२ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत सरासरी १२.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १४८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात १२ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. यात कंसात दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. लातूर ०.६ (१५६.६) मिमी, औसा ३१.२ (२०४) मिमी, अहमदपूर - १.७ (९४.४) मिमी, निलंगा ४३.४ (१९२.७) मिमी, उदगीर ३.६ (९३.९) मिमी, चाकूर - ०.४ (१५४.६) मिमी, रेणापूर - ४.१ (१६९.७) मिमी, देवणी ०.३ (१०५.३) मिमी, शिरूर अनंतपाळ - ४.४ (१४०.७).

जालना जिल्ह्यात मान्सून दाखल झालेला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच दमदार पावसाचे आगमन झाल्यामुळे जिल्ह्यात पेरणीला येग आला आहे. १ जूनपासून आतापर्यंत १२.६ मिमी. पावसाची नोंद झालेली आहे. बुधवारी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. जालना शहरात दिवसभर डगाळ वातावरण दिसून आले आहे, मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवार आणि मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे पूर्णा, दुधना, केळणा, जीवरेखा, कुंडलिका, गोदावरी आदी नद्या प्रवाहित झाल्या आहेत. मागील वर्षी या नद्यांना एकही पूर आला नव्हता. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. नद्यांना पाणी आल्यामुळे जलस्त्रोतांमधील पाण्यामध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :धरणपाणीमराठवाडापरभणी जिल्हा परिषदजालना जिल्हा परिषद