Join us

पावसाने वीस वर्षांतील विक्रम मोडला; या तालुक्यात तब्बल २२४ मिलिमीटर पाऊस पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:45 IST

मे महिन्यात गेल्या वीस वर्षांतील सर्वाधिक सरासरी १७४ मिलिमीटर पाऊस बरसला आहे. हा पाऊस केवळ १० दिवसांत म्हणजे २५ मेपर्यंत झाला आहे.

सांगली : जिल्ह्यात मे महिन्यात गेल्या वीस वर्षांतील सर्वाधिक सरासरी १७४ मिलिमीटर पाऊस बरसला आहे. हा पाऊस केवळ १० दिवसांत म्हणजे २५ मेपर्यंत झाला आहे.

सर्वाधिक २२४ मिलिमीटर शिराळा तालुक्यात झाला आहे. दुष्काळी जत तालुक्यात सर्वात कमी १२४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पण, हा पाऊसही गेल्यास २० ते २५ वर्षातील सर्वाधिक असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

उन्हाचा कडाका अन् पाण्याची टंचाई घेऊन येणारा मे महिना यंदा पाऊस घेऊन आला आहे. २५ दिवसांत १० दिवस पाऊस झाल्याने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे.

आठ दिवसांपासून सूर्यदर्शन दुर्मीळ झाले झाले नाही. पावसामुळे शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. दरम्यान, अनेक मंडळांत अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

जून महिन्यात सरासरी १२९ मिमी पाऊस होतो. वातावरणानुसार यामध्ये वाढ होते. मात्र, जून महिन्याच्या सरासरीएवढा यंदा २५ मे पर्यंतच १७४.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मे महिन्यातील आणखी सहा दिवस शिल्लक असल्याने जून महिन्याची सरासरी त्यापूर्वीच ओलांडली आहे. असाच पाऊस राहिल्यास खरीप लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

पाऊस चालूच राहणारअरबी समुद्र व कर्नाटकमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. यामुळे मे महिन्यात अवकाळी पाऊस होत आहे. आगामी चार दिवस काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. गोवा, कोकण किनारपट्टीमध्ये मान्सून दाखल असून, आपल्याकडे दहा दिवसांत येईल. यामुळे आता पाऊस लांबणार नाही, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

अवकाळी लागून राहिल्याने उसाला फायदा झाला. मात्र, आगामी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत अद्याप झाली नाही. शेतात वाफसा नसल्याने अन् अवकाळीनंतर मान्सून आल्यास खरीप पेरणी करण्यास अडचण होईल. वाफशाशिवाय ट्रॅक्टरने पेरणी शक्य नाही. - महावीर पाटील, शेतकरी

अधिक वाचा: Ujani Dam Water Level : भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

टॅग्स :शेतीशेतकरीपाऊसपेरणीसांगलीखरीपमोसमी पाऊस