राज्यात मागील चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे.येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अंदमान समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी २ डिसेंबरपर्यंत मिचांग हे चक्रीवादळ निर्माण होणार आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावर पूर्वीय वारे आणि चक्रीय वाऱ्यांचा संगम झाल्यामुळे नैऋत्य राजस्थानच्या भागात हे वादळी अडथळे निर्माण झाले आहेत.
विदर्भ-खान्देशात अजून तीन दिवस पावसाची शक्यता कायम
आज पुण्यासह राज्यातील २२ जिल्ह्यांना आज जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती,बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात आज तुरळक ठिकाणी हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज आहे.
यलो अलर्ट कुठे?
सांगली, सातारा,सोलापूर,पूणे अहमदनगर, नाशिक या मध्य महाराष्ट्रातील जिह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर,बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. खान्देशात जळगाव, धूळे, नंदूरबार तर विदर्भात वर्धा यवतमाळ जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर, बीड,जालना, धाराशिव, हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्यात उद्याही तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
तापमानात होणार घट
सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर असे ७ जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उर्वरित २९ जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४ डिग्रीने कमालीची घसरण जाणवत असुन तेथे दिवसाही चांगलाच गारवा जाणवू शकतो. विशेषतः विदर्भ मराठवाड्यात हा परिणाम अधिक जाणवेल. शनिवार दि.२ डिसेंबर पासून वातावरण पूर्णपणे निवळेल.