Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबर हीट वाढणार,  मराठवाड्यातील तापमानात पुढील ४८ तासात....

By मुक्ता सरदेशमुख | Updated: October 6, 2023 16:30 IST

उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करण्याचा सल्ला.

राज्यभरात नैऋत्य मोसमी पावसाने निरोप घेतल्यानंतर आता तापमान वाढीला सुरुवात झाली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील ४८ तासांत कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमाल तापमानात फारशी तफावत नाही. दरम्यान, दि. ६ ते १२ ऑक्टोबर दरम्यान हवामान कोरडे राहणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात दि ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढेच राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील काळात परतीच्या पावसाची शक्यता नसल्यामूळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी केल्यानंतर लगेच उपलब्ध जमिनीतील ओलाव्यावर  लवकरात लवकर रब्बी पिकांची पेरणी करण्यास सांगण्यात आले आहे. 

राज्यात पावसाने उघडीन दिल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागातून पावसाने माघार घेतली असून ऑक्टोबर हीट वाढण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पाच दिवस राज्यात कोरड्या हवामानासह उन्हाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान आज नैऋत्य मान्सूनचा जोर इशान्य भारतात वाढणार असून तीव्र स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

टॅग्स :हवामानपाऊसशेतकरीरब्बी