Nashik Rain Alert : मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाज (IBF) आणि चेतावणी लक्षात घेता दि. १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये एक-दोन ठिकाणी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडा, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
तसेच दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी घाट क्षेत्रामध्ये एक-दोन ठिकाणी (येलो अलर्ट) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक जिल्हा तसेच घाट क्षेत्रामध्ये एक-दोन ठिकाणी (येलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
मुसळधार पाऊस व विजांचा अंदाज लक्षात घेता पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतःचे विजांच्या कडकडाट पासून संरक्षण करावे व नाशिक व जिल्हाच्या घाट क्षेत्रातील फळबाग, भाजीपाला पिके, खरीप / रांगडा कांदा रोपवाटिका/पुनर्लागवड क्षेत्र, खरीप पिकातील जास्तीचे पाणी काढून टाकावे.
जर शेतकरी शेतात असतील आणि त्यांना कोणताही निवारा मिळाला नसेल तर त्या परीसरातील सर्वात उंच वस्तू टाळा. जर फक्त तुरळक झाडे जवळपास असतील तर सर्वात चांगले संरक्षण म्हणजे उघड्यावर दबा धरून बसावे (आपले पाय पोटाशी व हात कानावर आणि डोळे झाकावे म्हणजे शरीराचा आकार कमी करणे).