Join us

Monsson Update मॉन्सून आला गोव्यात, राज्यात या ठिकाणी मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 09:29 IST

Monsoon मॉन्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात, गोव्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा भागात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला वरुणराजाने हजेरी लावली आणि विजयी उमेदवारांचा आनंद द्विगुणित केला. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी पावसातही आनंदोत्सव साजरा केला. सकाळपासून प्रचंड उकाडा सहन करणाऱ्या पुणेकरांना सायंकाळी वरुणराजाने दिलासा दिला.

आकाशात ढगांची गर्दी झाली आणि जोरदार सरींची बरसात झाली. त्यामुळे काही मिनिटांमध्येच रस्ते पाण्याखाली गेले. मॉन्सून केरळपासून पुढे सरकला असून, लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तत्पूर्वी मॉन्सूनपूर्व पावसाचा अंदाज राज्यासह पुण्यात देण्यात आला आहे.

पुण्यात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील, बिबवेवाडी, धनकवडी, घोरपडी, मार्केट यार्ड, शिवाजीनगर, एरंडवणा, सातारा रोड, स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, सिंहगड रोड, कर्वेनगर आदी भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. शहरभर पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.

वडगावशेरीत ढगफुटीसारखा पाऊसवडगावशेरी, धानोरी, कात्रज परिसरामध्ये ढगफुटीसारखाच पाऊस झाला आहे. त्यामुळे तिथे अक्षरशः चारचाकी देखील पाण्यात वाहन होत्या. अनेक वाहने पाण्यामध्ये वाहून गेल्याचे पहायला मिळाले. त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. वडगावशेरीत ११४.५ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच कात्रजमध्ये ११३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा रेकॉर्ड पाऊस असल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले.

राज्यात या ठिकाणी पावसाचा अंदाजकोकणातील जिल्ह्यांना पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यात पुढील पाच दिवस औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, लातूर, नांदेड, जालना, परभणी येथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भातही सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मॉन्सून कुठे पोहोचला? मॉन्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या आणखी काही भागात, गोव्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांमध्ये हा मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा भागात पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

वडगावशेरी परिसरात झालेला पाऊस हा ढगफुटीसारखा होता. त्यामुळे तिथे रस्त्यांवर प्रचंड पाणी पहायला मिळाले. वडगावशेरीतील हा पाऊस रेकॉर्डब्रेक आहे. पूरसदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी पहायला मिळाली. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

टॅग्स :मोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजगोवापाऊसहवामानमहाराष्ट्रतेलंगणा