बापू सोळंके
मराठवाड्याचे सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने ३० वर्षांपासून ३ मोठे, ११ मध्यम, १९ लघु पाटबंधारे प्रकल्प आणि २९ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील काही बंधाऱ्यांची कामे ९५ टक्के पूर्ण झाली आहेत, तर काही बंधाऱ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. बंधारे अस्तित्वात आल्यानंतर मराठवाड्यातील सिंचनक्षमतेत १ लाख ६१ हजार ८७८ हेक्टरने भर पडणार आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांसाठी विशिष्ट मुदतीत निधी आला नाही. परिणामी, आज या प्रकल्पांच्या किमतीत शेकडो पट वाढ झाली आहे. लेंडी प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्यातील २६ हजार ९४८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवना प्रकल्प, पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना, गंगापूर तालुक्यासाठी असलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना क्रमांक ३ तसेच देवगाव रंगारी, पूर्णा नदीवरील १० साखळी बंधारे, इटेवाडी साठवण तलाव, सताळपिंप्री साठवण तलाव इ. प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली.
जालना जिल्ह्यातील बरबडा, हातवन लघु प्रकल्प, पाटोदा साठवण तलाव या प्रकल्पांमुळे ४११९ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढेल. बीड जिल्ह्यात कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेमुळे आष्टी तालुक्यातील ८१४७ हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. सिंदफणा प्रकल्पाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाकडून केले जात आहे.
परभणी जिल्ह्याच्या सिंचनक्षमतेत १३ हजार १७६ हेक्टरची भर घालणाऱ्या ममदापूर या उच्च पातळी बंधाऱ्याचे काम सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात २ मोठे, १ मध्यम प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांमुळे १ लाख १ हजार १३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात ७ लघु तलावांची कामे सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे.
२९ कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे प्रगतिपथावर
• मराठवाड्यातील विविध नद्यांवर २९ कोल्हापुरी बंधारे बांधण्याची कामे हाती घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णा नदीवर १० साखळी बंधारे बांधण्यास शासनाने मंजुरी दिली.
• बीड जिल्ह्यातील तीरु नदीवर ७ बंधारे आणि मानार नदीवर ८ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात येत आहे. तावरजा नदीवर ४ कोल्हापुरी बंधाऱ्याची कामे सुरू आहेत.