लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. रविवारी (दि. २१) दुपारी १ वाजता धरणाचे ४ दरवाजे (गेट क्रमांक १, ३, ४ आणि ६) ०.२५ मीटरने वर उचलण्यात आले.
सध्या मांजरा नदीपात्रात ८७३५.७० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण पूर्ण भरल्याने पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि परिसरातील लोकांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जाईल.
धनेगावच्या मांजरा धरणाच्या सांडव्याचे ६ दरवाजे उघडले
बीड : मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रविवारी धरणाचे गेट उघडताच धरणाच्या सांडव्याचे देखील ६ दरवाजे उघडले आहेत.
यामुळे मांजरा नदीपात्रात ५२४१.४२ क्युसेक (१४८.४४ क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता, विसर्ग वाढविण्याबाबत किंवा कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे जलसंपदा विभागाने कळविले आहे.