मुंबई : मुंबईसह राज्यभरात मंगळवारी हवामानात झालेले बदल बुधवारीही कायम होते. त्यात आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे.
तर मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी हवामानात बदल झाला, तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले. राज्यात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत असला तरी कमाल तापमानाचा कहर कायम आहे.
बुधवारी अहिल्यानगर ३७, बीड ३९.८, मालेगाव ३८.४, मुंबई ३६.९, नाशिक ३७.३, सोलापूर येथे ३८ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात आज, गुरुवारी आकाश ढगाळ राहील. तसेच हलका पाऊस होईल, असा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचे नुकसान झाले आहे.
विदर्भाला वादळ, गारपिटीचा इशारापुढील २४ तासांत विदर्भातील काही भागांत सोसाट्याचे वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपीटही होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगाल, हिमालय क्षेत्र ते मध्य प्रदेशपर्यंत तयार झालेले सायक्लोनिक सर्क्युलेशन, बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे आणि उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांचा संगम, तसेच महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
अधिक वाचा: मागील वर्षीच्या तुलनेत ज्वारीच्या कडब्याला मोठी मागणी; शेकडा कसा मिळतोय दर?