Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमान १० अंशांवर ; येत्या काही दिवसांत थंडी वाढणार IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 09:48 IST

राज्यात या आठवड्यात वातावरणात मोठा बदल झाला असून थंडी वाढली आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात या आठवड्यात वातावरणात मोठा बदल झाला असून थंडी वाढली आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी  वाढताना दिसत आहे.  त्यातच बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशची स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक जिल्ह्यात तापमान कमी झाले आहे.

यात प्रामुख्याने पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

राज्यात गारठा वाढला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. प्रामुख्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमान कमी झाले असून पुणे, निफाड आणि धुळ्यात पारा हा १०.५ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिक थंडीने गारठले आहे. रात्री आणि सकाळीच्या वेळी थंडी जाणवत असून दुपारी तापमानात वाढ जाणवत आहे. राज्यात पुढील काही दिवसांत गारठा वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात उद्या(२३ नोव्हेंबर) रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानात होऊन २६ नोव्हेंबर पासून पुढे तापमानात बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कसे असेल हवामान ?

राज्यात येत्या काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पहाटे गारठा वाढण्याची शक्यता आहे. तर रात्रीच्या वेळी हवामानात मोठी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील काही दिवस तापमानात फारसा बदल होणार नसला तरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुण्यात गारठा वाढला

पुण्यात तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान ११ अंश सेल्सिअसवर आले आहे. सकाळी आणि रात्री मोठी थंडी पडत असून नागरिक शेकोट्यांचा आधार घेऊ लागले आहेत. सकाळी धुके पडत असून वातावरण गार झाले आहे. तर दुपारी ऊन असे हवामान बघायला मिळत आहे.

मुंबईत सकाळी थंडी दुपारी उकाडा

मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबईतही गारठा वाढला आहे. रात्री आणि पहाटेच्या सुमारास अल्हाददायक वातावरण आहे. मात्र, दुपारनंतर उकाडा वाढत असल्याचे चित्र आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागातही थंडी वाढली आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात तापमान १५ अंशापेक्षा कमी झाले आहे. हे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील घाटमाथ्यावरील परिसरात थंडी वाढणार आहे. पुढचे पाच दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* केळी बागेत खतमात्रा दिली नसल्यास ५० ग्रॅम पालाश प्रति झाड खतमात्रा देण्यात यावी. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. केळी बागेत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये.

* आंबा बागेत माल फार्मेशनचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एनएए ची फवारणी करावी. आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी ००:५२:३४ विद्राव्य खताची १५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.  

* पुर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानशेतकरीशेतीमहाराष्ट्र