Join us

Maharashtra Rain : आज सकाळपासून मराठवाड्यात संततधार पावसाला सुरूवात; धरणे भरू लागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 14:47 IST

Maharashtra Rain Updates : हवामान विभागाच्या अंदाजानुसार आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. 

Maharashtra Rain Updates : जवळपास दीड ते दोन आठवड्यांच्या खंडानंतर आजपासून मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये संततधार पावसामुळे शेतकरी सुखावले आहेत. यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांसाठी आणि फुलोऱ्यात असलेल्या पिकासांठी संजीवनी मिळाली आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. 

दरम्यान, मराठवाड्यातील सर्वांत महत्त्वाचे असलेले जायकवाडी धरण मागील दोन ते तीन आठवड्यापूर्वी ४० टक्क्याच्या आसपास होते. या धरणाची पाणीपातळी आता ८५ टक्क्यांपर्यंत गेली असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बीडमध्ये संततधार पावसामुळे बिंदुसरा प्रकल्प भरला आहे. तर इतर छोटेमोठे प्रकल्प या पावसामुळे शंभरीकडे वाटचाल करत आहेत.(Marathwada Rain Updates)

हिंगोली शहरामध्ये रस्ते जलमय झाले असून जिल्ह्यातही सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, सोलापूर, या जिल्ह्यांत आज सकाळपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तर नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावारण असल्याची माहिती आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पुस नदीला पूर आल्यामुळे पुलावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. तर नांदेड आणि तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या रस्त्यावर नदीच्या पुराचे पाणी आल्यामुळे संपर्क तुटला होता. पण या पावसामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांना आणि पिकांना फायदा होणार आहे.(Latest Rain Updates in Maharashtra)

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसशेतकरीपीक