Join us

Lower Dudhana Project : दुधनेच्या पाण्याचा हरभरा, गहू, ज्वारी पिकांना बुस्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:16 IST

Lower Dudhana Project : निम्न दुधना प्रकल्पातून शेती पिकांना पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न मार्गी लागणार आहे.

सेलू : निम्न दुधना प्रकल्पाच्या (Lower Dudhana Project)दोन्ही कालव्यातून रब्बी (Rabbi) हंगामातील पिकांना दुसरे आवर्तन सोडण्यात आले असून कालवा लाभक्षेत्रातील हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांना (Crops) दुधनेच्या पाण्याचा मोठा आधार मिळाला आहे.

६ जानेवारीपासून पाणी आवर्तन सोडण्यात आल्यामुळे चार तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे.

यंदा जून महिन्यातच निम्न दुधना प्रकल्पात पाण्याची आवक सुरू झाली होती. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर आला होता.

त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती; परंतु प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात गेलेल्या असंपादित जमिनीवर प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा केल्यानंतर पिकांचे नुकसान होत असल्यामुळे प्रकल्पात केवळ ७५ टक्केच पाणी शिल्लक ठेवून उर्वरित पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले होते.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले होते.

खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांमधून चांगले उत्पन्न काढण्यासाठी मेहनत घेतली आहे. अतिवृष्टीमुळे कापसाचा दोन वेचणीतच झाडा झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस उपटून हरभरा व गव्हाची पेरणी केली आहे.

यंदा दुधना प्रकल्पात समाधानकारक पाणी उपलब्ध असल्याने रब्बी हंगामातील पिकांना चार पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार २७ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत दुधनेतून पहिले आवर्तन सोडण्यात आले होते.

त्यावेळी रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांची पेरणी करण्यासाठी कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी शेतकऱ्यांनी वापरले होते. त्यानंतर पिकांची वाढ होत असतानाच प्रकल्पातून पुन्हा ६ जानेवारीपासून दुसरे आवर्तन देण्यात आले आहे.

अतिवृष्टी झाल्यामुळे विहीर, बोअरला समाधानकारक पाणी असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे क्षेत्र वाढले आहे.

सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा व त्यानंतर गव्हाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, निम्न दुधना प्रकल्पातून रब्बी हंगामातील पिकांना चार पाण्याचे नियोजन केल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना लाभ होणार आहे.

पिकांना चार पाणी आवर्तन

यंदा दुधना प्रकल्पात समाधानकारक पाणी उपलब्ध असल्याने रब्बी हंगामातील पिकांना चार पाणी आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार २७ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत दुधनेतून पहिले आवर्तन सोडण्यात आले होते.

पहिल्याच आवर्तनातून ९ दलघमी पाणी

* निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यात पाणी सोडल्यानंतर कालवा लाभक्षेत्रातील ५ ते ६ हजार हेक्टर वरील पिकांना पाणी उपलब्ध होते.

* सेलू, मानवत, जिंतूर व परभणी तालुक्यातील कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना सिंचन करण्यासाठी दुधनेच्या पाण्याचा मोठा आधार मिळाला आहे.

* त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे उत्पन्न देखील वाढणार आहे. दरम्यान, पहिल्याच पाणी आवर्तनाला ९ दलघमी पाण्याचा वापर झाला होता.हे ही वाचा सविस्तर : Godavari River Water : 'नांमका'च्या कालव्याचे काम पूर्णत्वास जाईना काय आहे कारण ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रपाटबंधारे प्रकल्पपाणीकपातपाणीगहूपीक