नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील आठ नंबर चारीला कपालेश्वर जवळील हत्ती नदीवरील पुलाला अनेक ठिकाणी भगदाड पडले असून त्यामधून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. संबंधित विभागाने अद्याप याकडे लक्ष दिले नसून त्यातून जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोपाळसागर (केळझर) धरणातून उत्तर दिशेकडे आठ नंबर पाट चारीच्या माध्यमातून अनेक गावांना शेती सिंचनासाठी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी पाणीपुरवठा केला जातो. ह्या चारीला डांगसौदाणे परिसरात गळती होत असल्याने बऱ्याच ठिकाणी शेतपिकाचे नुकसान होत होते. याबाबत येथे बंदिस्त पाइपलाइन टाकावी, अशी मागणी जोर धरत होती.
याबरोबरच या चारीचे अपूर्ण काम मार्गी लावून हे पाणी चौगाव, मुळाणे, भाक्षी, कौतिकपाडे, अजमेर सौंदाणेपर्यंत या चारीने पाणी मिळावे, अशी मागणी देखील या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा केली आहे. पण आजमितीस फक्त डोंगरेज गावाच्या पुढे पर्यंतच पाणी पोहोचते.
एका बाजूला दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हे पाणी आपल्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी डोळे लावून बसले असताना दुसऱ्या बाजूला गळतीमुळे हजारो लीटर पाणी दररोज वाया जात आहे. आठ नंबर चारीचे पाणी पुढील गावांना जाण्यासाठी कपालेश्वर जवळील हत्ती परिसरात पूल बांधून या पुलाच्या माध्यमातून हे पाणी चारीच्या माध्यमातून पुढे जाते. या दगडी पुलाची निर्मिती अंदाजे १९८० च्या सुमारास झाल्याचे सांगितले जाते.
दुरुस्तीची मागणी
दगडी बांधकाम असलेल्या पुलाला काही ठिकाणी भगदाड पडले त्यातून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. पुलाखालून दररोज वाहनांची वर्दळ असते. या पडलेल्या भगदाड मुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबधित विभागाने पडलेले भगदाड त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा : पशुपालकांनो आवर्जून तयार करत चला 'गो'धनाची जन्मकुंडली; दूध व्यवसायात मिळवा आर्थिक वृद्धी