Join us

Gosekhurd Dam : वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:15 IST

Gosekhurd Dam : गोसेखुर्द प्रकल्पात (Gosekhurd Dam) २४२.३१० मीटर पाण्याची पातळीत असून जलस्तर सातत्याने वाढतच आहे.

भंडारा : राज्यात सर्वदूर पाऊस हजेरी लावत असून आता विदर्भाला (Vidarbha Rain) चांगलेच झोडपून काढत आहे. पावसाची संततधार कायम असल्याने वैनगंगा नदीच्या (Vainganga River) जलसाठ्यात वाढ झाल्याने गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व ३३ ही दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले आहेत. येथून १३,०४० क्युमेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

गोसेखुर्द प्रकल्पात (Gosekhurd Dam) २४२.३१० मीटर पाण्याची पातळीत असून जलस्तर सातत्याने वाढतच आहे. यामुळे प्रकल्पातून विसर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. सोमवारी सकाळी ९ गेट उघडण्यात आले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजता ११ गेट, सायंकाळी साडे पाच वाजता २१ व रात्री साडे आठ वाजता २७ गेट उघडण्यात आले.

प्रकल्पातून विसर्ग करूनही कॅचमेंट एरियातून पाणी मोठ्या प्रमाणावर साठतच असल्याने आणि पाऊसही वाढतच असल्याने रात्री दीड वाजता सर्व ३३ गेट दीड मीटरने उघडण्यात आले. सकाळी ते दोन मीटरने उघडण्यात आले आहेत.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारागोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग होत आहे त्यामुळे नदीकाठावरील ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार महेंद्र सोनुने परिस्थितीवर जातीने लक्ष ठेवून आहेत. मंडळ अधिकारी व तलाठी यांना कार्यालयाच्या ठिकाणी राहण्याचे आदेश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन व जीवरक्षक टीमच्या सदस्यांना पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात दक्ष राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याचा संपर्क तुटलाभंडारा जिल्ह्यात सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाचा कहर सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली असून जनजीवन अक्षरक्षः विस्कळीत झाले आहे. मध्यप्रदेशसह गोंदिया जिल्ह्यातील धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे भंडारा शहराच्या आऊटर भागाला पुराचा धोका बळावला आहे. दरम्यान बावनथडी नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या महाराष्ट्र मध्यप्रदेश आंतरराज्य पुलावरून आज मंगळवारी सकाळपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. बावनथडी नदीच्या पुराच्या पातळीत वाढ होत असल्याने सिहोरा गावाला धोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :गोसेखुर्द प्रकल्पनागपूरपाऊसविदर्भमोसमी पाऊस