Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vidarbha Heat Wave : मार्चमध्येच ४०° पार; विदर्भात उष्णतेचा जोर, वाशिम 'हॉट' जिल्ह्यांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:45 IST

Vidarbha Heat Wave : मार्च महिन्यातच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. अमरावती येथे सर्वाधिक ४१.८ अंश तापमान नोंदवले गेले असून वाशिम जिल्हाही उष्णतेच्या यादीत सामील झाला आहे.(Vidarbha Heat Wave)

Vidarbha Heat Wave : यंदा उन्हाळ्याने वेळेआधीच हजेरी लावली असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्यातच तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे.(Vidarbha Heat Wave)

त्यातच पूर्वी तुलनेने थंड समजला जाणारा वाशिम जिल्हाही आता विदर्भातील 'हॉट' जिल्ह्यांच्या यादीत सामील झाला आहे. महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात तापमान ४० अंशांपुढे गेल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.(Vidarbha Heat Wave)

मागील काही वर्षांत मार्च अखेरपर्यंत ३५ ते ३६ अंश सेल्सिअसदरम्यान राहणारे तापमान यंदा अचानक वाढले आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत उकाडा प्रचंड वाढला असून बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वर्दळ कमी झाल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे लागत असून उष्णतेमुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.

पर्यावरण तज्ज्ञांच्या मते यंदा हिवाळा लवकर संपुष्टात आल्याने उष्णतेला तुलनेने लवकर प्रारंभ झाला. याशिवाय वातावरणातील आर्द्रता कमी होणे, ढगाळ वातावरणाचा अभाव आणि कोरडे वारे यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता थेट जमिनीवर पडत आहे.

बेसुमार वृक्षतोड, वेगाने वाढणारे काँक्रीटीकरण आणि जलस्त्रोतांची घटती पातळी ही स्थानिक कारणेही तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहेत.

जागतिक स्तरावरील हवामान बदल (Climate Change) चा परिणामही विदर्भासह या भागात जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामध्ये अमरावती (Amravati) जिल्हा सर्वाधिक 'हॉट' ठरला असून १३ मार्च रोजी येथे ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

त्यापाठोपाठ अकोला येथे ४१.५ अंश, ब्रह्मपुरी येथे ४१.४ अंश, वर्धा येथे ४०.६ अंश आणि वाशिम येथे ४०.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

तसेच यवतमाळ  येथे ४०.४ अंश, चंद्रपूर येथे ४० अंश, बुलढाणा येथे ३९.६ अंश, नागपूर येथे ३९.४ अंश, गोंदिया येथे ३८.८ अंश आणि गडचिरोली येथे ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

तापमानात झालेल्या या वाढीचा परिणाम शेती, जनजीवन आणि आरोग्यावरही जाणवू लागला आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास वाढल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि शक्यतो दुपारी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांतही उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून विदर्भातील तापमानात आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात हवामानाचा यू-टर्न; कोकणात उष्णतेची लाट, विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा अलर्ट

अधिक वाचा : Flower Market : फुलांच्या बाजारात मोठी तेजी; मोगरा ९०० तर काकडा १२०० रुपये किलो

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Scorches: Heatwave Intensifies, Temperatures Soar Past 40°C in March

Web Summary : Vidarbha faces an early heatwave, with temperatures exceeding 40°C in March. Washim, previously cooler, joins the 'hot' districts. Citizens are concerned as daily life is disrupted. Experts cite climate change, deforestation, and reduced water levels as causes. Amravati recorded the highest temperature at 41.8°C.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजविदर्भशेतकरीशेती