Cold Weather : सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी, आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच जाणवणार असुन पुढील ३ दिवस परवा बुधवार दि.१९ नोव्हेंबरपर्यंत अशीच कडाक्याची थंडी जाणवू शकते..
तीव्र थंडीची लाट -
महाराष्ट्रात यवतमाळ व जेऊरला पहाटे पाच वाजता अनुक्रमे ९.६ व ८ अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन ही तापमाने सरासरीपेक्षा अनुक्रमे ७.४ व ६.५ इतक्या अंश से. ने खालावून तेथे व लगतच्या परिसरात तीव्र थंडीची लाट जाणवत आहे.
थंडीची लाट-
जळगांव, नाशिक, मालेगाव, गोंदियाला पहाटे पाच वाजता अनुक्रमे ९.८, ९.६, १० व १० अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन ही तेथीक तापमाने तेथील सरासरीपेक्षा अनुक्रमे ५, ५, ५.१ व ५.८ इतक्या अंश से. ने खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची लाट जाणवत आहे
थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती -
महाराष्ट्रातील डहाणू, अहिल्यानगर, पुणे, सातारा, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या शहरात व लगतच्या परिसरात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.
महाराष्ट्रात सध्याची थंडी कश्यामुळे?
सध्या उत्तर भारतात एकापाठोपाठ पश्चिमी झंजावात नाही. दोन पश्चिमी झंजावात काही दिवसांच्या गॅपमुळे, अगोदरच झालेल्या बर्फ वृष्टीवरून ताशी २५ ते ३० किमी वेगाने पूर्व दिशेकडून पूर्वीय अतिथंड वारे उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे झेपावत आहे. शिवाय महाराष्ट्रात आकाश निरभ्र आहेच.
तसेच महाराष्ट्र सहित संपूर्ण वायव्य भारतात हवेच्या दाबात ४ ते ६ हेक्टापास्कलने वाढ होवून १०१६ ते १०१८ हेक्टापास्कल अश्या एकसमान व एकजिनसी हवेच्या दाब उत्तर भारताबरोबर सध्या महाराष्ट्रातही जाणवत आहे. त्यामुळे हवेच्या घनतेत वाढ होत आहे. म्हणून सध्या थंडीला अनुकूल वातावरण आहे..
संपूर्ण महाराष्ट्र ओलांडून ही थंडी उत्तर कर्नाटक व उत्तर तेलंगणात झेपावली आहे. अश्या प्रकारे येणाऱ्या थंडीला अडथळा न देणारा हवेच्या दाबाचा पॅटर्नही सध्या महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात आहे. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात चौफेर थंडी जाणवत आहे.
थंडी कधी कमी होणार?
वारा वहन पॅटर्न मध्ये होणाऱ्या बदलातून शनिवार दि. २२ नोव्हेंबर पासुन महाराष्ट्रात सध्यापेक्षा केवळ काहीशी थंडी कमी होण्याची शक्यता जाणवते. त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यावेळी सविस्तरपणे अवगत केले जाईलच
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.
