Join us

Maharashtra Rain : अरबी समुद्रातील 'डिप्रेशन सिस्टीम'मुळे पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 17:40 IST

Maharashtra Rain : कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबई : अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतरण होणार असून, अरबी समुद्रातील क्षेत्रामुळे मुंबईसह लगतच्या परिसरांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील तीव्र दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी चक्रीवादळात रूपांतर होईल. 

मंगळवारी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकेल. नंतर त्याचा प्रवास छत्तीसगडच्या दिशेने होईल. त्यामुळे सोमवार, मंगळवार आणि बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल.

 कमी दाबाचे क्षेत्रअरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र मुंबईपासून ४५० किमीवर आहे. त्याचे रूपांतर कदाचित तीव्र दाबाच्या क्षेत्रात होईल. हे क्षेत्र महाराष्ट्रापासून दूर जात असले तरी सोमवारी पुन्हा ते वळण घेण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र उत्तर कोकण आणि दक्षिण गुजरातच्या मधल्या भागात बुधवारी सरकेल. यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर बुधवार ते गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील 'डिप्रेशन सिस्टीम'मुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, घाट क्षेत्र, लगतच्या मराठवाड्याच्या काही भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. ही सिस्टीम मुंबईपासून सुमारे ४०० किमी दूर आहे. उत्तर वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.- कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

३१ ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश, विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

टॅग्स :पाऊसमोसमी पाऊसहवामान अंदाजमहाराष्ट्रशेती क्षेत्र