Rabi Crops Boost : अकोला येथील महान परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारे चित्र सध्या काटेपूर्णा धरणाच्या परिसरात पाहायला मिळत आहे. (Rabi Crops Boost)
रब्बी हंगामासाठीकाटेपूर्णा धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने कालव्याच्या काठावरील तसेच नदीकाठच्या गावांमध्ये शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. धरणाच्या पाण्यामुळे शेतजमिनींनी हिरवा शालू पांघरला असून गहू, हरभरा यांसह विविध पिके जोमात वाढत आहेत.(Rabi Crops Boost)
यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने काटेपूर्णा धरण तुडुंब भरले आहे. खरिप हंगामात काही भागांत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असले तरी, धरणातील मुबलक जलसाठ्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Rabi Crops Boost)
याच पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबरपासून नदीकाठावरील परवाना धारक शेतकऱ्यांसाठी सिंचन व्हॉल्व्हद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.(Rabi Crops Boost)
विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी
धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठावरील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेकडो हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
या भागात हरभरा, गहू, भुईमूग, हळद, उन्हाळी तूर, कांदा तसेच भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. वेळेवर पाणी उपलब्ध होत असल्याने पिकांची वाढ समाधानकारक होत असल्याचे शेतकरी सांगतात.
गव्हाखालील क्षेत्रात वाढ
यंदा हिवाळ्यात थंडीचा जोर चांगला असल्याने तसेच गव्हाला पोषक हवामान मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल गहू पिकाकडे वाढला आहे. शिवाय गव्हाचा बाजारभावही समाधानकारक राहण्याची अपेक्षा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी इतर पिकांऐवजी गहू पेरणीला प्राधान्य दिले आहे. परिणामी मागील वर्षांच्या तुलनेत यंदा गव्हाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
रब्बीवर शेतकऱ्यांची मोठी भिस्त
खरिप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई रब्बी पिकांतून भरून काढण्याच्या आशेने शेतकरी वर्ग रब्बी हंगामाकडे आशेने पाहत आहे. धरणाच्या पाण्यामुळे शेतजमिनी हिरवीगार झाल्याने परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. थंडी वाढल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशी उपटून गव्हाची पेरणीही सुरू केली आहे.
विहिरी-बोअरवेल्सना नवसंजीवनी
काटेपूर्णा धरणातून सुरू असलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेल्सच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सिंचनाची चिंता कमी झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
६५ गावांना पिण्याच्या पाण्याचा आधार
अकोला व मूर्तिजापूर शहरासह परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविणारे काटेपूर्णा धरण यंदाही शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करत आहे.
या धरणातून अकोला शहर, मूर्तिजापूर शहर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी, महान मत्स्य बीज केंद्र तसेच खंभोरा-उन्नई बंधारा पाणीपुरवठा योजनेंतर्गत सुमारे ६४ ते ६५ गावांना वर्षभर पिण्याचे पाणी पुरवले जाते.
रब्बी हंगामासाठी उपलब्ध झालेल्या मुबलक पाण्यामुळे काटेपूर्णा परिसरातील शेती पुन्हा एकदा बहरली असून, शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांना नवे बळ मिळाले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Katepurna Dam : रब्बी पिकांना दिलासा; काटेपूर्णा धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ
