नाशिक : मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार दि. १५ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा तसेच घाट क्षेत्रातील एक-दोन ठिकाणी (यलो अलर्ट) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे.
दि. १६ व १८ सप्टेंबर २०२५ रोजी (यलो अलर्ट) नाशिक जिल्हा तसेच घाट क्षेत्रातील एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस तसेच नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे मान्सून वारे सक्रिय होऊन पाऊस होत आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून या प्रवासात पावसाने शनिवारपासून हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी शहरासह उपनगरांमध्ये दुपारी मध्यम ते तीव्र सरी कोसळल्या. गंगापूर धरणातून २७६ क्युसेकने विसर्ग गोदावरीत पुन्हा सुरू करण्यात आला आहे. तर गुरुवारपर्यंत (दि. १८) हवामान विभागाने 'यलो अलर्ट' दिला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास..यावर्षी मान्सून २४ मे रोजी केरळसह तामिळनाडू, कर्नाटक अशा तीन राज्यांत एकाच दिवशी दाखल झाला होता. देशभरात ११३ दिवस मान्सूनने हजेरी लावली. राजस्थानमधून रविवारी मान्सूनने तीन दिवस अगोदरच परतीचा प्रवास सुरू केला आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली. १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून पूर्णतः परतेल, असेही ते म्हणाले.