नाशिक : पुन्हा जिल्ह्यासाठी बुधवारी (दि.१) व गुरुवारीसुद्धा (दि.२) 'ऑरेंज' अलर्ट देण्यात आला आहे. विजांचा कडकडाटासह गडगडाटी स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अपेक्षित आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे व पशुधनाचे संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यावर रविवारपासून अवकाळीचे ढग दाटून येत आहे. शहरालगतच्याही गाव, खेड्यांमध्ये पावसाची तुरळक ते मध्यम हजेरी आहे; मात्र जिल्ह्यातील पूर्वभागातील तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. रविवार, सोमवारपाठोपाठ मंगळवारीही सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने 'हॅट्रिक' केली. कळवण तालुक्यातील विविध गावांमध्ये मुसळधार पाऊस झाला.
बुधवारी व गुरुवारी जिल्ह्यातील काही तालुक्यांत आणि घाटक्षेत्रांमध्ये विजांच्या कडकडाटासह ५० ते ६० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी विजा चमकत असताना सुरक्षितस्थळी थांबावे. पावसाळी वातावरण तयार होताच शेतीची कामे थांबवून घरात आश्रय घ्यावा व पाळीव प्राण्यांनाही गोठ्यात सुरक्षितरित्या बंदिस्त ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कमाल तापमान घटले; किमान वाढलेमंगळवारी शहरात कमाल तापमान ३४.२ अंश तर किमान तापमान २०.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. सोमवारी कमाल तापमान ३६.९ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिरावले होते; मागील २४ तासांत २.७ अंशाने घट झाली तर किमान तापमानात एक अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे रात्रीचा उकाडा वाढला आहे. मंगळवारी उन्हाची तीव्रता काही प्रमाणात कमी जाणवली.