Marathwada Weather Update : मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची हजेरी लागणार आहे. ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.(Marathwada Weather Update)
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा व मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.(Marathwada Weather Update)
जिल्हानिहाय अंदाज
९ व १० सप्टेंबर : मराठवाड्यात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस.
११ सप्टेंबर : नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना व पाऊस.
१२ सप्टेंबर : हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता.
१३ सप्टेंबर : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. तर लातूर व धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
वाऱ्याचा वेग
११ ते १३ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत राहणार आहे. त्यामुळे झाडे, विद्युत तारांवर ताण, तसेच शेतातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सूचना
* हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
* शेतात पाणी साचू नये याची काळजी घ्यावी.
* सोयाबीन, तूर, उडीद यासारख्या पिकांवर कीड व बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
* उभे पिके व झाडे यांना वादळी वाऱ्यापासून संरक्षण द्यावे.
सतर्कतेचा इशारा
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वादळी वारा व विजांच्या कडकडाटाच्या काळात झाडाखाली किंवा उघड्या जागेत थांबणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.