Marathwada Crop Damage : मराठवाड्यावर पुन्हा एकदा आभाळ फाटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जूनपासून सप्टेंबरपर्यंत सुरू असलेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Marathwada Crop Damage)
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सलग झालेल्या पावसाने तब्बल ५ हजार ३२० गावांतील २० लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. फक्त मागील नऊ दिवसांतच सुमारे ४ लाख ९१ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. (Marathwada Crop Damage)
२ हजार ३०० कोटींच्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज
विभागीय प्रशासनाने शासनाकडे पाठविलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांचे २ हजार ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती यापेक्षा गंभीर असून शेतकऱ्यांचे नुकसान यापेक्षा खूपच अधिक असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. (Marathwada Crop Damage)
शासनाने यापूर्वी जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी ७०० कोटींच्या भरपाईला मंजुरी दिली होती. परंतु यंदाची खरी स्थिती या आकड्यांपेक्षा कितीतरी गंभीर आहे. (Marathwada Crop Damage)
विक्रमी अतिवृष्टी
सप्टेंबरमध्ये एकाच दिवशी सर्वाधिक मंडळांत अतिवृष्टी झाल्याचा विक्रम यंदा नोंदला गेला आहे.
१३ सप्टेंबरला – १९ मंडळे
१४ सप्टेंबरला – ५३ मंडळे
१५ सप्टेंबरला – ३२ मंडळे
१६ सप्टेंबरला – ४१ मंडळे
२२ सप्टेंबरला – तब्बल ७५ मंडळे
पैठण तालुक्यातील आपेगाव मंडळात एका दिवसात तब्बल १६६ मि.मी. पावसाची नोंद झाली.
जिल्हानिहाय नुकसान (१५ सप्टेंबरनंतर)
छत्रपती संभाजीनगर : १ लाख ५११ हेक्टर
जालना : ५,१२२ हेक्टर
परभणी : १० हजार हेक्टर
हिंगोली : ११ हजार हेक्टर
नांदेड : ३ लाख ५१ हजार हेक्टर
बीड : ६,४७० हेक्टर
धाराशिव : ६,८७५ हेक्टर
एकूण : ४ लाख २१ हजार हेक्टरवर फटका
एकत्रित नुकसान (१५ सप्टेंबरपर्यंत)
छत्रपती संभाजीनगर : २५१ हेक्टर
जालना : १६,९५९ हेक्टर
परभणी : १,५१,२२२ हेक्टर
हिंगोली : २,७३,४१३ हेक्टर
नांदेड : ५,६४,४०१ हेक्टर
बीड : ६४,२४७ हेक्टर
लातूर : २,७४,८७७ हेक्टर
धाराशिव : १,७२,२२९ हेक्टर
एकूण : १६ लाख ८ हजार ३०१ हेक्टरवर फटका
कोणत्या पिकांना फटका?
या अतिवृष्टीमुळे मुख्यतः सोयाबीन, कापूस, मका, कडधान्ये, तेलबिया या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच मोसंबी व केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या हातून हंगाम अक्षरशः वाहून गेला आहे.
गावांचा संपर्क तुटला
अवकाळी पावसामुळे धाराशिव, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २२ गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होऊन ७० जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
गेल्या वर्षाचा रेकॉर्ड मोडला
गेल्या वर्षी २२ सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यात ११७ टक्के पाऊस (७४६ मि.मी.) झाला होता. यंदा मात्र १२४ टक्के (७८९ मि.मी.) पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षाचा विक्रम मोडला आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम अक्षरशः पाण्यात गेला आहे. भरघोस पिकाची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान कसे भरून काढायचे, हा मोठा प्रश्न शासनासमोर उभा आहे.