Join us

Marathawada Rain Update : मराठवाड्यावर वरुणराजाची कृपा; संततधारेने खरिपास दिला नवसंजीवनीचा श्वास वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:57 IST

Marathawada Rain Update : मराठवाड्याचा सुकलेला श्वास अखेर वरुणराजाच्या दमदार आगमनाने सुटला आहे. मागील काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे संपूर्ण मराठवाडा पावसात भिजला. (Marathawada Rain Update)

Marathawada Rain Update : मराठवाड्याचा सुकलेला श्वास अखेर वरुणराजाच्या दमदार आगमनाने सुटला आहे. मागील काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. (Marathawada Rain Update)  

मात्र, शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे संपूर्ण मराठवाडा पावसात भिजला. एका बाजूला खरिपातील पिकांना जीवदान मिळत असताना दुसरीकडे मंठा तालुक्यातील पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. (Marathawada Rain Update)  

जनजीवन विस्कळीत झाले असले तरी शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.(Marathawada Rain Update)  

मराठवाडा विभागात सव्वा महिन्याच्या विश्रांतीनंतर वरुणराजाने जोरदार पुनरागमन करत संपूर्ण भागात मुसळधार व रिमझिम पावसाची हजेरी लावली. (Marathawada Rain Update)  

या संततधारेमुळे कोमेजलेल्या खरिपातील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर उमटली आहे. मात्र, काही भागांत या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक व संपर्क व्यवस्था खंडित झाली आहे.(Marathawada Rain Update)  

मंठा तालुक्यात पूल वाहून गेला 

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील कानडी ते देवठाणा, तळणी व बन (ता. सेनगाव) दरम्यान असलेला पूल शुक्रवारी दुपारी मुसळधार पावसामुळे वाहून गेला. 

या घटनेमुळे कानडी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांना अत्यंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सदर पूल देवठाणा गावाजवळील असून तो काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाच्या कामाची वेळोवेळी तक्रार केली होती. या तक्रारींना दुजोरा देत, या मुसळधार पावसाने पुलाची गुणवत्ता उघड केली आहे. या मार्गावरून विद्यार्थी, शेतकरी, मजूर व सामान्य नागरिकांची नेहमीची वर्दळ असते, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. 

नानासाहेब खंदारे यांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित यंत्रणांवर कारवाईची मागणी केली आहे.

नांदेड जिल्ह्यात २६० मिमी पाऊस 

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २६०.७० मिमी पावसाची नोंद झाली असून केवळ २५ जुलै रोजी १०.०७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधी अनेक भागात पिके कोमेजू लागली होती, त्यामुळे या पावसाचे महत्व अधिक आहे.

परभणीत सर्वदूर पाऊस – पिके तरारली

परभणी जिल्ह्यात गुरुवार सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने शुक्रवारीही विश्रांती घेतली नाही. अनेक तालुक्यांमध्ये रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या भीजपावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जालना जिल्ह्यात १६.६० मिमी पाऊस – पेरण्या वाचल्या

जालना जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली. जालना, अंबड, मंठा, परतूर तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. २४ तासांत जालना तालुक्यात ४१.१० मिमी, जाफराबादमध्ये २७.७० मिमी, तर मंठ्यात २४.४० मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले असून वार्षिक सरासरीच्या ४२.७३% पाऊस आतापर्यंत झाला आहे.

बीड शहरात दिवसभर रिमझिम

बीड शहरात शुक्रवार सकाळी १० वाजता सुरू झालेला पाऊस दिवसभर सुरू राहिला. दुपारी थोडा खंड पडला, मात्र पुन्हा पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे रस्त्यांवर चिखल साचला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. वाहनांची वर्दळ कमी झाली होती, तर अनेकांनी घराबाहेर जाणे टाळले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संततधार 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच सर्वदूर रिमझिम पाऊस सुरू झाला. काही भागांमध्ये जोरदार संततधार झाली. पैठण, सिल्लोड, खुलताबाद, कन्नड, गंगापूर, वैजापूर, फुलंब्री व सोयगाव आदी तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. 

पाण्याअभावी कोमेजलेली पिके या पावसामुळे तारली गेली आहेत. विशेष म्हणजे, खुलताबाद परिसरातील वेरूळ लेणी परिसरातील धबधबाही ओसंडून वाहू लागला, त्यामुळे पर्यटकांची उपस्थिती वाढली.

खरिप पिके वाचली

सध्या जिल्ह्यात ५ लाख ६३ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर खरिप पिकांची पेरणी झाली आहे. यातील ४ लाख ६४ हजार ३९६ हेक्टरवर सोयाबीन तर ६८ हजार ३३७ हेक्टरवर तुरीचा पेरा आहे. आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्र कोरडे गेल्यामुळे पिके सुकू लागली होती. मात्र आता सुरू झालेल्या पुष्य नक्षत्रातील पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

सर्वदूर झालेल्या या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी जलवाहतूक व पूल वाहून जाण्यामुळे समस्या उभी ठाकली आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. 

शेतकरी मात्र वरुणराजाच्या या आगमनाने उत्साहित असून पुढील काही दिवस नियमित पावसाची अपेक्षा करत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Heavy Rains in Marathwada : पंधरवड्यांनंतर पावसाची जोरदार हजेरी; मराठवाड्यात ३० मंडळांत मुसळधार पाऊस

टॅग्स :शेती क्षेत्रमराठवाडापाऊसहवामान अंदाजबीडलातूरजालनाखरीप