Join us

Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा, 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 19:15 IST

Maharashtra Rain : त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra Rain :  विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात २५-२६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा (Heavy rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ (प्रामुख्याने पूर्व विदर्भ) आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ आणि नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. हा कमी दाबाचा पट्टा २७ जुलैपर्यंत मध्य प्रदेशात सरकण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) २५-२६ जुलैदरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातदेखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भालगतच्या पूर्व मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर उर्वरित मराठवाडा आणि खान्‍देशातदेखील पावसाचा अंदाज आहे.

पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, आणि सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्येदेखील यादरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. 

सध्याच्या अंदाजानुसार २६ जुलैला पावसाचे प्रमाण सर्वात अधिक असण्याची शक्यता आहे. २५-२६ जुलैदरम्यान पूर्व विदर्भात धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही; तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात काही प्रमाणात दरड कोसळणे आणि सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :पाऊसहवामान अंदाजमोसमी पाऊसमहाराष्ट्रशेती क्षेत्र