Maharashtra Weather Update : गेल्या दिवसांपासून प्रचंड गारठा (Gartha) जाणवत असून या आठवड्यात थंडीसह पाऊस, आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आज व उद्या (सोमवार व मंगळवार दि. २३ व २४ डिसेंबर) ला मुंबई,कोकणसहित संपूर्ण महाराष्ट्रात बोचऱ्या वाऱ्यासहित माफक प्रमाणात थंडीची शक्यता (Cold Weather) ही कायम असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे. .
ऊबदारपणा :
परवा व नंतर, बुधवार आणि गुरुवार दि. २५-२६ डिसेंबरला ढगाळ वातावरणासहित किंचितशीच थंडी कमी होवून संपूर्ण महाराष्ट्रात ऊबदारपणा जाणवेल.
पाऊस :
गुरुवार ते शनिवार दि. २६ ते २८ डिसेंबर दरम्यानच्या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः नंदुरबार धुळे जळगांव मालेगाव नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर छ.सं.नगर अकोला अमरावती नागपूर वाशिम शेगाव नगर पुणे नागपूर गोंदिया चंद्रपूर नांदेड परभणी जिल्ह्यात व लगतच्या परिसरात पावसाची शक्यता अधिक जाणवते.
गारपीट -
सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता शुक्रवार दि. २७ डिसेंबर ला संपूर्ण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात असे एकूण २५ जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी किरकोळ गारपीटीची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छ.सं.नगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात व लगतच्या परिसरात गारपीटीची शक्यता अधिक जाणवते.
गारपीटीची शक्यता कशामुळे वाढली?
सध्याच्या २६ डिसेंबर दरम्यान देशात प्रवेशलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून व राजस्थानच्या आग्नेय ला दिड ते दोन किमी. उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची व ८०० मीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैरुक्त दिशेकडून तर बं. उपसागरातून पूर्वे दिशेकडून आलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांची अशा तीन वाऱ्यांच्या टक्करीतून कमी उंचीवरच सांद्रीभवन घडून येते-न -तेच घनीभवन होवून म्हणजेच डायरेक्ट द्रविकरणाची स्टेज लगेचच ओलांडून घनीभवन होवून गारपीट होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
पुन्हा थंडी :
मात्र वर्षाअखेरीस म्हणजे सोमवार दि. ३० डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होवुन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा करू या!
- माणिकराव खुळे,
Meteorologist (Retd.)
IMD Pune.