Maharashtra Rain : मान्सूनच्या सक्रियतेनंतर आजपासुन सुरु होणाऱ्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे गुरुवार दि. १८ सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातही उद्या व परवा, म्हणजे रविवार व सोमवार दि. १४ व १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते. अत्याधिक पाऊस - त्यातही विशेषतः पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर म्हणजे मावळ, मुळशी, ताम्हिणी, लोणावळा, खंडाळा, वेल्हे तसेच पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, पाटण व लागतच्या परिसरात या दोन दिवसात अत्याधिक पावसाची शक्यता जाणवते. पाऊस तीव्रतेतील कमी अधिक फरक - मंगळवार दि. १६ सप्टेंबर पासुन संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १८ जिल्ह्यात पावसाचा जोर (तीव्रता) पूर्णपणे नव्हे परंतु काहीसा कमी जाणवेल. कोकण, विदर्भातील पावसाचे सातत्य - मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ अशा १८ जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचे सातत्य सध्या तरी आजपासुन पुढील १० दिवस म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवते.
वेध परतीच्या पावसाचे - परतीच्या पावसाचे वेध जरी लागले असले तरी पावसाच्या इतर प्रणाल्यांचे अस्तित्व पाहता तो १५ सप्टेंबरच्या आसपास किंवा त्यानंतर परत फिरण्याची शक्यता आज जाणवते. वातावरणीय निरीक्षणा नंतरच त्याच्या तारखे संबंधी घोषणा होवु शकते.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune.