पुणे : यंदा राज्यात मान्सूनच्या पावसाने सरासरीपेक्षा तब्बल बारा दिवस आधी हजेरी लावली. पण मान्सूनच्या आगमनानंतर जवळपास पावणेदोन महिन्यापर्यंत महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडलेला दिसत नाही.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून शेतीतील पिकांना त्याचा फटका बसताना दिसून येत आहे.
दरम्यान, यंदा मे महिन्यामध्येच मान्सूनचे आगमन झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतीची मशागत झाली नसतानाही शेतीमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्र सुरू होण्याच्या आधीच पिकांची पेरणी किंवा लागवड केली होती. पण जून महिन्याच्या एका आठवड्यानंतर पावसाची सरासरी महाराष्ट्रात कमी झाली. पूर्ण जून आणि जुलै महिन्यातही काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
कोणत्या जिल्ह्यांत कमी पाऊस?1 जून ते 16 जुलै पर्यंत मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हा, मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच 16 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात कोकण विभाग, कोल्हापूर, सांगली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडला असून उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
पिकांना फटका मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील कमी पाऊस असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी या पिकांना फटका बसताना दिसून येत आहे. राज्यातील पेरण्या पूर्ण होऊन सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पिकांची जोमाने वाढ होण्यासाठी पावसाची आवश्यकता असताना पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.