रूपेश उत्तरवार
राज्यात यावर्षी जून-जुलैमध्ये समाधानकारक पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ मे अखेरच्या सरींत काही भागात पेरण्या सुरू झाल्या. मात्र आता ऑगस्टमध्येही पावसाने पाठ फिरविल्याने राज्यातील २०७ तालुक्यांत पावसाची सरासरी टक्केवारी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Kharif Crop)
या अटीतटीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या असल्या तरी पिकांची वाढ खुंटली आहे, काही ठिकाणी तर पिके कोमेजत आहेत. त्यातच खतांचा तुटवडा आणि किडींचा प्रादुर्भाव यामुळे संकट अधिकच गडद झाले आहे.(Kharif Crop)
खरिपाला फटका; पाणी, खते आणि किडींचे संकट
राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी २०७ तालुक्यांमध्ये निर्धारित सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
पावसाची सध्याची टक्केवारी
२५ ते ५०% पाऊस : १० तालुके
५० ते ७५% पाऊस : ६७ तालुके
७५ ते १००% पाऊस : १४० तालुके
१००% पेक्षा जास्त पाऊस : १३७ तालुके
राज्यात एकूण १ कोटी ४४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असताना आतापर्यंत १ कोटी ३७ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. यामध्ये कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांचा समावेश आहे.
उन्हाचा तीव्र चटका आणि अपुऱ्या पावसामुळे यापैकी अनेक पिकांची वाढ थांबली आहे, तर काही ठिकाणी पिके सुकून चालली आहेत.
खतांचा तुटवडा ही अडचण निर्माण करत असून, किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने शेतशिवारांवर तडाखा दिला आहे.
वीज पडून ५ जणांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यातील वणी, पांढरकवडा आणि यवतमाळ तालुक्यांमध्ये शेतीकाम करत असताना अचानक वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अडेगाव, गोपालपूर व रोहटेक येथील शेतशिवारांमध्ये या घटना घडल्या.
सोलापुरात १०९ मिमी पावसाचा कहर
दुसरीकडे, सोलापुरात मात्र बुधवारी (६ ऑगस्ट) रात्री २ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पाच तासात तब्बल १०९ मिमी पाऊस पडल्याने शहरात घरांमध्ये आणि शाळांमध्ये पाणी शिरले आहे. जुलै महिन्यातील पावसाची कसर ऑगस्टच्या सुरुवातीलाच भरून काढताना अनेक रस्ते जलमय झाले.
शेतकऱ्यांचे भविष्य पुन्हा पावसावर अवलंबून
राज्याच्या मोठ्या भूभागात पिकांची अवस्था नाजूक बनली आहे. आगामी आठवड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास, राज्यातील खरिपाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारकडून खतसाठा व कीड नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना अपेक्षित आहेत.