Katepurna Dam Water Release : महान तालुक्यातील काटेपूर्णा धरण परिसरात सततच्या पावसामुळे जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने धरणाचे चार दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून काटेपूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. (Katepurna Dam Water Release)
नदीकाठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. (Katepurna Dam Water Release)
सुरक्षेच्या दृष्टीने सोमवार, (८ सप्टेंबर) रोजी धरणाचे चार दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सकाळी ७ वाजता धरणाची पाणीपातळी ३४७.६५ मीटर इतकी नोंदली गेली होती. त्यावेळी जलसाठा ८४.३४७ दशलक्ष घनमीटर (९७.६८ टक्के) इतका होता. (Katepurna Dam Water Release)
पाणीपातळी धोक्याच्या टप्प्यावर पोहोचल्याने सकाळी ७.३० वाजता सुरुवातीला दोन गेट प्रत्येकी एक फूट उघडून ५१.१६ घनमीटर प्रति सेकंदाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. (Katepurna Dam Water Release)
यानंतर वाढत्या पाण्यामुळे सकाळी १० वाजता आणखी दोन गेट उघडण्यात आले. एकूण चार गेट प्रत्येकी दोन फूट (६० सें.मी.) उघडण्यात आल्याने धरणातून १९७.९३ घनमीटर प्रति सेकंदाने विसर्ग सुरू आहे. (Katepurna Dam Water Release)
काटेपूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागली
वाढत्या विसर्गामुळे काटेपूर्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाच्या मोऱ्यापर्यंत पाणी पोहोचले असून नदी दुथडी भरून वाहत आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचे, नदीपात्र ओलांडू नये असे आवाहन केले आहे.
धरण क्षेत्रात आतापर्यंत एकूण ४६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाढत्या जलसाठ्याची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता संदीप नेमाडे व कर्मचारी सतत लक्ष ठेवून आहेत.