Join us
Daily Top 2Weekly Top 5

Jayakwadi Canal Water Release : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर; जायकवाडीमधून ४ आवर्तने; पाण्याची चिंता संपली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:16 IST

Jayakwadi Canal Water Release : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत जायकवाडी प्रकल्पातून डाव्या आणि उजव्या कालव्यांतून प्रत्येकी चार आवर्तने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या या घोषणेमुळे सिंचन व्यवस्थेला बळ मिळणार असून पाणीटंचाईवर मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.(Jayakwadi Canal Water Release)

Jayakwadi Canal Water Release : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून प्रत्येकी चार आवर्तने देण्याची घोषणा केली. पैठण येथील संतपीठात झालेल्या जायकवाडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.(Jayakwadi Canal Water Release)

या निर्णयामुळे संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतील शेतीला उन्हाळ्यात आवश्यक पाणी मिळण्यास मदत होणार असून, पाणीटंचाईच्या समस्येवर काही प्रमाणात उपाय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर

बैठकीत केटी वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावांनाही मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून पाण्याचे साठवण क्षमता वाढवून सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नांदूर मधमेश्वर कालवा आणि निम्न दुधना प्रकल्पातूनही प्रत्येकी चार आवर्तने देण्यास मान्यता देण्यात आली.

पर्यटन विकासालाही चालना

जायकवाडी, इसापूर, निळवंडे, भंडारदरा, माजलगाव यांसारख्या धरण परिसरात पर्यटन विकासाची संकल्पना मांडण्यात आली आहे. जलक्रीडा उपक्रमांसह रिसॉर्ट उभारणीस मान्यता देण्यात आली असून, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे.

धरणातील गाळ काढण्याचा निर्णय

जायकवाडी धरणात सुमारे २० अब्ज घनफूट गाळ साचलेला आहे. हा गाळ काढण्यासाठी खासगी संस्थांशी करार करण्यात येणार आहे. गाळ काढल्यास धरणाची पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होईल.

पाणीपट्टी वसूलीत वाढ

जलसंपदा विभागाने यंदा पाणीपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ केली असून, तब्बल ५२० कोटी रुपयांची वसूली झाली आहे.

यापूर्वी ही वसूली ३०० कोटींच्या आसपास होती. मात्र, विभागावर अजूनही सुमारे १,८०० कोटींची थकबाकी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

कालव्यांच्या दुरुस्तीसाठी मोठी तरतूद

उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७३५ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

पुढील दीड वर्षात ही कामे पूर्ण करून गळती थांबवण्याचा मानस आहे. यामुळे १० ते १५ टीएमसी पाण्याची बचत होऊन शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल.

सौर ऊर्जेचा वापर वाढवणार

राज्यातील उपसा सिंचन योजनांसाठी लागणारा वीजपुरवठा सौर ऊर्जेवर आणण्याचा विचार करण्यात येत आहे. विविध धरणांवर तरंगत्या सौरपटलाद्वारे वीज निर्मिती करण्याचे धोरण आखले जात आहे.

जायकवाडी प्रकल्पातून चार आवर्तने देण्याचा निर्णय, बॅरेज उभारणी, कालवा दुरुस्ती आणि सौर ऊर्जा वापर यांसारख्या उपाययोजनांमुळे मराठवाड्यातील सिंचन व्यवस्थेला मोठे बळ मिळणार असून शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Manjara River Water Release : मांजरा काठचा शेतकरी सुखावला; उसाला मिळणार मोठं 'जीवनदान' वाचा सविस्तर

अधिक वाचा : Banana Market : आंध्र-तेलंगणाचा माल देशात; 'या' कारणामुळे केळी स्वस्त!

English
हिंदी सारांश
Web Title : Jayakwadi Canal to Release Water for Farmers: Relief Awaits

Web Summary : Farmers in Marathwada get relief as Jayakwadi project canals will release four rounds of water. This decision addresses water scarcity in Sambhajinagar, Jalna, Beed, and Parbhani districts. Canal repairs, solar power use, and dam desilting are also planned to boost irrigation.
टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणधरणपाणीशेतकरीशेती