Join us

नाशिकहुन जायकवाडीकडे आतापर्यंत 32 टीएमसी पाणी पोहचले, जायकवाडीत किती टक्क्यांवर? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:20 IST

Jayakwadi Dam : महिनाभरात झालेल्या विसर्गामुळे जायकवाडीकडे तब्बल ३२ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

नाशिक : गेल्या महिनाभरापासून सातत्याने हजेरी लावणाऱ्या पावसाने जिल्ह्यात दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणांमध्ये सुरू असलेला विसर्ग कमी होत असून आता ८ धरणांमधून होणारा विसर्गही कमी करण्यात आला आहे. 

दरम्यान या पावसामुळे तब्बल ५ धरणे १०० टक्के तर ८ धरणे ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत. महिनाभरात झालेल्या विसर्गामुळे जायकवाडीकडे तब्बल ३२ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाचपट अधिक पाणी उपलब्ध असून त्यामुळे यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही. जून ते सप्टेंबर हा पावसाचा हंगाम असला तरी यंदा मे मध्येच पावसाने जोर धरला.

जून आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांत जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा चांगला जोर राहिला. विशेषत: अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार सरी कोसळल्याने धरणांमधून विसर्गही सुरू करावा लागला. तरीही सद्यस्थितीत जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये ५० हजार ६०७ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७१.६६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. 

गतवर्षी २० जुलैला धरणांमध्ये केवळ १२ हजार ६६६ दशलक्ष घनफूट म्हणजेच १७.९४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाचपट अधिक पाणी उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी रविवारी दिली. गंगापूर धरण समूहातील ५ धरणे पूर्ण भरली आहेत.

दिंडोरीत सर्वाधिक पावसाची नोंद...आत्तापर्यंत झालेल्या पावसाची सर्वात जास्त दिंडोरी तालुक्यात झाली असून येथे तब्बल १५८ टक्के पाऊस झाला आहे. त्या खालोखाल निफाड तालुक्यात १५६, नाशिक तालुक्यात १३३, त्र्यंबकेश्वर तालुक्यात १२१, दुष्काळी समजल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात ११६, येवल्यात ११३ तर पेठ तालुक्यात १०९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणगंगापूर धरणशेतीहवामान अंदाजपाऊसधरण