Join us

Jayakawadi Dam : जायकवाडी साठवण क्षमतेत मोठी घट; काय आहे कारण वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 09:34 IST

Jayakawadi Dam : सिंचन, पिण्याचे पाणी आणि उद्योग यांचा आधार असलेल्या जायकवाडीत ४९ वर्षांत १० टक्के गाळ साचला आहे. त्यामुळे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता लक्षणीय घटली आहे. तज्ज्ञांनी तातडीने उपाययोजनांची गरज व्यक्त केली आहे. (Jayakawadi Dam)

दादासाहेब गलांडे

मराठवाड्याच्या पाणीपुरवठा व सिंचनासाठी जीवनरेखा मानला जाणारा जायकवाडी धरण प्रकल्प आता गाळसाठ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे. (Jayakawadi Dam)

धरण बांधून तब्बल ४९ वर्षे उलटली असून या कालावधीत प्रकल्पात जवळपास १० टक्के गाळ साचल्याचे तज्ज्ञांनी निदर्शनास आणले आहे. यामुळे धरणाची मूळ पाणी साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ९२ टीएमसीपर्यंत घटली आहे.(Jayakawadi Dam)

फक्त दोनच सर्वेक्षण

धरणातील गाळाचे सर्वेक्षण केवळ दोन वेळाच झाले आहे. पहिल्यांदा १९९६ साली आणि दुसऱ्यांदा २०१२-१३ मध्ये. नाशिकच्या मेरी संस्थेने केलेल्या पहिल्या सर्वेक्षणात जिवंत साठ्याच्या ७ टक्के म्हणजे ५.३६ टीएमसी गाळ असल्याचे नमूद केले होते. तर दुसऱ्या सर्वेक्षणाचा (२०१४ अहवाल) निष्कर्ष असा की ८.२४ टक्के म्हणजे ६.२५ टीएमसी गाळ जमा झाला आहे.(Jayakawadi Dam)

गेल्या ११ वर्षांत कोणतेही नवे सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे या कालावधीत गाळाचा साठा आणखी वाढल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सिंचन, पाणीपुरवठा आणि उद्योगांवर परिणाम

जायकवाडी प्रकल्पातून ३५ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन केले जाते, तर जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिण्याचा पाणीपुरवठा आणि उद्योगधंदे याच धरणावर अवलंबून आहेत. वाढत्या गाळामुळे पाणी साठवण कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचा धोका अधिक वाढू शकतो.(Jayakawadi Dam)

शेजारील शेतजमिनींचे नुकसान

गाळसाठ्यामुळे धरणाशेजारील विनासंपादीत क्षेत्रात गेल्या सहा वर्षांपासून पाणी शिरून पिकांचे नुकसान होत आहे. धरणातील गाळ काढणे ही अतिशय खर्चिक आणि तांत्रिक दृष्ट्या अवघड प्रक्रिया आहे. त्यातच, जायकवाडी हा पक्षी संरक्षित प्रकल्प असल्याने गाळ काढण्यावर पर्यावरणीय निर्बंध आहेत.(Jayakawadi Dam)

तज्ज्ञांचे काय मत

प्रकल्पात साचणारा गाळ गृहीत धरूनच जायकवाडी प्रकल्पाचे आयुष्य १०० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. जायकवाडीचे गाळाचे सर्वेक्षण यापूर्वी दोन वेळा मेरी संस्थेने केले आहे. वाढलेल्या गाळामुळे प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता कमी होते. मृत आणि जिवंत साठ्यात हा गाळ असतो. जायकवाडी प्रकल्प पक्षी संरक्षित म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यामुळे या प्रकल्पातील गाळ काढण्यावर निर्बंध आहेत. - डॉ. शंकरराव नागरे, जलतज्ज्ञ

मागील ११ वर्षात आणखी गाळाचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. या कालावधीत गाळ वाढला आहे. या गाळाने प्रकल्पाची साठवण क्षमता १०२ टीएमसीवरून ९२ टीएमसीपर्यंत कमी झाली आहे. वाढत्या गाळामुळेच प्रकल्पाशेजारील विनासंपादीत क्षेत्रात सहा वर्षांपासून धरणाचे पाणी शिरून पिकांचे नुकसान होत असते. धरणातील गाळ काढणे खूप खर्चिक बाब आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे. - मंगेश शेलार,  शाखा अभियंता 

हे ही वाचा सविस्तर : Jayakawadi Dam Water : जायकवाडी भरले; १.८ लाख हेक्टर शेतीला दिलासा वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रधरणजायकवाडी धरणपाणीशेतकरीशेती