जळगाव : जिल्ह्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पावसाची (Jalgaon Rain) आकडेवारी कमी असली तरी, जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसह मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्याची स्थिती दिलासादायक आहे. २० जुलैपर्यंत जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु प्रकल्प मिळून ४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे, जो गेल्यावर्षीच्या याच दिवसाच्या २७ टक्के साठ्यापेक्षा जास्त आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची मोठी चिंता तूर्तास दूर झाली आहे.
तसेच आगामी दोन महिन्यात सरासरी इतकाही पाऊस जिल्ह्यात झाला तरीही पाण्याची चिंता मिटणार आहे. नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) येणाऱ्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणात पाण्याची आवक सातत्याने सुरू आहे आणि ते ५५ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांची स्थिती पाहिली असता गिरणा धरण ५५ टक्के तर मागील वर्षी ११ टक्के, वाघुर धरण ६५ टक्के तर मागील वर्षी ६३ टक्के, हतनुर धरण २६ टक्के तर मागील वर्षी ३३ टक्के असा साठा आहे.
जिल्ह्यात पाऊस कमी, तरी प्रकल्पांमध्ये चांगलं पाणी का?जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये २० जुलैपर्यंत दिलासादायक जलसाठा आहे. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात पावसाची सरासरी पाहिली तर कमी पाऊस झाला आहे. तरी धरणांमधील समाधानकारक जलसाठा का..? असा प्रश्न निर्माण होत आहे.
त्याचे मुख्य कारण जिल्ह्यात जरी पाऊस कमी झाला असला तरी या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे. गिरणेचे पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात, यासह हतनूर व सुकी धरणाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या मध्यप्रदेशातही चांगला पाऊस झाल्याने या धरणांमध्ये चांगला जलसाठा आहे.