जळगाव : निम्म्या जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेल्या गिरणा धरणातून रब्बी हंगामातील यंदाचे दुसरे ९५० क्युसेक आवर्तन सोडण्यात आले. पांझण डावा कालवा ८० क्युसेक व जामदा डावा कालवा, जामदा उजवा कालवा व निम्न गिरणा कालव्याच्या रब्बी हंगामासाठी ९५० क्युसेक आवर्तन सोडण्यात आले.
रब्बी हंगामातील पिके वाढीचा काळ असताना या आवर्तनामुळे पिकांना मोठा फायदा मिळणार आहे. दरम्यान मन्याड धरणातूनही दुसरे आवर्तन सुटले आहे.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील शेतीला फायदा
या आवर्तनामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव, एरंडोल या भागातील शेतीला फायदा होणार आहे. सुमारे १ लाख ४१ हजार ३६४ हेक्टर क्षेत्र भिजवण्याची क्षमता गिरणा धरणाची आहे.
धरणात पुरेसा साठा असल्याने यंदा सिंचनासाठी पाच आवर्तने मिळणार असून आणखी तीन आवर्तने शिल्लक आहेत. त्यामुळे रब्बी हंगामासह पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गिरणा धरणाच्या ५७ वर्षाच्या इतिहासात गेल्या वर्षी धरणाचे सर्वच्या सर्व १४ दरवाजे उघडण्यात आले होते.
दमदार पावसामुळे १५ पैकी ११ धरणे फुल्ल
दरम्यान गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे गिरणासह चाळीसगाव तालुक्यातील १५ प्रकल्पांपैकी ४ धरणे वगळता इतर धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा दिसून येत आहे.
गिरणा धरण गेल्या वर्षी १०० टक्के भरल्याने रब्बी हंगामासाठी पाच आवर्तने सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला होता. त्यातील पहिले आवर्तन गेल्या डिसेंबर महिन्यात सोडण्यात आले होते. त्यानंतर महिनाभरानंतर दुसरे आवर्तन १२ फेब्रुवारी रोजी सोडण्यात आले.
