Join us

गिरणा, वाघूर ओव्हरफ्लो, जळगाव जिल्ह्यात पुढील पाच दिवस पाऊस कसा राहील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 18:45 IST

Girna Dam : जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे जलस्रोत असलेले गिरणा आणि वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

जळगाव : जिल्ह्यासाठी यंदा पावसाळा सुखद ठरला आहे. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे जलस्रोत असलेले गिरणा आणि वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७५ हजार हेक्टर शेतीला पाणी मिळणार असून, सिंचनाचा मोठा प्रश्न सुटला आहे. विशेषतः वाघूर धरणामुळे जळगाव शहर आणि जामनेर शहराचा दोन वर्षांसाठीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

'वाघूर'चे २० दरवाजे उघडले, ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्गजळगाव शहराला पाणीपुरवठा होणारा वाघूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी सकाळी ६ वाजता व नंतर १० वाजता पाण्याची आवक वाढल्याने प्रकल्पाचे २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून तब्बल ६५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मध्यम प्रकल्पापैकी बहुळा प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडून तब्बल ६० हजार क्युसेकचा विसर्ग केला जात आहे.

गिरणा धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्गजिल्ह्याच्या ६ तालुक्यांमधील ५२ हजार हेक्टर शेतीसाठी वरदान असलेले गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून सध्या १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाचोरा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा नदीला मोठा पूर आला आहे. जिल्ह्यातील ६ तालुक्यांतील ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनाचा प्रश्न यंदा पूर्णपणे मिटला आहे.

जळगावात आगामी पाच दिवस हवामानाची स्थिती

  • १७ सप्टेंबर - विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (यलो अलर्ट)
  • १८ सप्टेंबर - ३० ते ४० किमी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस (यलो अलर्ट)
  • १९ सप्टेंबर - ३० ते ४० किमी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस (यलो अलर्ट)
  • २० सप्टेंबर - ३० ते ४० किमी वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस (यलो अलर्ट)
  • २१ सप्टेंबर - दिवसभर ढगाळ वातावरण, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीजळगावपाऊसहवामान अंदाज