Join us

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! अवकाळी वातावरणापासून सुटका मिळणार, वाचा हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 17:06 IST

अवकाळी वातावरण निवळणार असुन उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पावसासारख्या वातावरणापासून सुटका मिळेल.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हैराण केले आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून आज अवकाळी वातावरणाचा शेवटचा दिवस असुन उद्या मंगळवार दि.३० एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात वीजा, वारा, गारा व अवकाळी पावसासारख्या वातावरणा पासून सुटका मिळेल, असे संकेत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहेत. 

मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यातील रात्रीचा उकाडा - 

मात्र उद्या मंगळवार दि. ३० एप्रिलपासून  खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा संपूर्ण १० जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील ८ जिल्ह्यातील सर्व नव्हे परंतु काही भागात, पहाटेचे किमान तापमान सरासरीपेक्षा ४ तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा २ डिग्री से. ग्रेड ने वाढल्यामुळे दिवसाची उष्णतेबरोबर रात्रीच्या उकाड्यातही कमालीची वाढ होवून काहिली जाणवणार आहे. विशेषतः रात्रीचा उकाडा अधिक जाणवेल.                  दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ह्या पाच जिल्ह्यात ह्या उष्णतेचा परिणाम अधिक जाणवेल. येत्या मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात ह्या दोन्हीही तापमानात मात्र हळूहळू वाढीचीच शक्यता असुन जन-जीवनाला  ह्या असह्य उष्णता व उकाड्याशीच चांगलाच सामना करावा लागेल, असे वाटते. 

विदर्भ - 

विदर्भातील दोन्हीही तापमाने सध्या सरासरी इतकी असल्यामुळे तेथे सर्व सामान्य उष्णता जाणवेल. 

कोकणातील उष्णतेची लाट 

मुंबई शहर तसेच उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अश्या ७ जिल्ह्यात सध्या चालु असलेल्या उष्णतेच्या लाटेचा तसेच रात्रीच्या उकाड्याचा प्रभाव कायम असुन तेथील जनजीवनाला येत्या मे महिन्यातील पहिल्या आठवड्यातही ह्या असह्य काहिलीचा सामना करावा लागेल, असे वाटते. 

       कशामुळे उष्णतेचे वातावरण टिकून             महाराष्ट्राच्या पश्चिम कि. पट्टीवर अरबी समुद्रात हंगामी प्रत्यावर्ती वाऱ्यामुळे वायव्येकडून येणारी उष्णता व तयार झालेला हवेचा उच्चं दाब आणि त्यातून स्थिरावलेले वेगवान वारा (वहन) ह्यामुळे कोकणात उष्णतेची लाट टिकून आहे. मध्य महाराष्ट्रात तयार झालेल्या दक्षिणोत्तर वारा खंडितता प्रणालीतून तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा द्रोणीय आस व त्यामुळे शांत वारा व वाढलेले पहाटेचे किमान तापमानामुळे रात्रीच्या  उकाड्यात वाढ झालेली आहे.

लेखक : माणिकराव खुळे, जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ आयएमडी पुणे 

टॅग्स :हवामानशेतीपाऊसनाशिकतापमान