नाशिक : गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून नाशिकच्या गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविला जात आहे. सद्यस्थितीत गंगापुर धरण ९७ टक्के भरले आहे. जवळपास २४५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीत सोडला आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ या भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे पुन्हा एकदा दारणा, गंगापूर. पालखेड, नांदुर मध्यमेश्वर धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. कारण ही धरणे तुडुंब भरली आहेत.
पूरपाण्याची वेगवान आवक होत असल्याने नद्यांमध्ये विसर्ग सोडला जात आहे. दारणा, गोदावरी, पुनंद, कादवा या नद्यांचा जलस्तर उंचावला आहे. गंगापूर धरणात रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ११० दलघफू इतके नवीन पूरपाणी आले. धरणसाठा ९७.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून 'यलो' अलर्ट दर्शविण्यात आला आहे.
२५ धरणे भरण्याच्या मार्गावर...जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी गंगापूर, दारणा, भंडारदरा, वालदेवी, कडवा यांसह काही लहान धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, कडवा, अलकनंदा, हरसूल, नांदुर माध्यमेश्वर, चांदवड परिसरातील काही धरणे यांसह मिळून एकूण १५ पेक्षा जास्त धरणे २० टक्क्यांपेक्षा जास्त भरली असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.