जळगाव : हतनूर धरण १० ऑक्टोबर रोजी शंभर टक्के भरल्यानंतरही तापी व पूर्णा नद्यांमधून धरणात अल्प प्रमाणात तरी आवक सुरू आहे. आगामी आठवडाभर ही आवक चालू राहण्याची शक्यता असून, धरणातील पाणीसाठा स्थिर राहील, असे चित्र आहे.
दरम्यान, रब्बी हंगामासाठी धरणातून पहिल्या आवर्तनाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे यावल व चोपडा तालुक्यातील तब्बल ३७ हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.
धरण भरल्यानंतरही सतत चालणारी आवक ही यंदाच्या हंगामाची वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली आहे. साधारणपणे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पहिले आवर्तन सोडले जाते; मात्र यंदा परतीच्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने पाटबंधारे विभागाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आवर्तन देण्याचा निर्णय घेतला आहे.
यानंतर तापी नदीतील विसर्गामुळे शेळगाव बॅरेजमध्येही मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. पुढील काही दिवस धरणात येणारी आवक कायम राहिल्यास साठ्याची पातळी स्थिर राहण्यास मदत होईल.
हतनूर जलाशयातील पाण्याचे होणार व्यवस्थापन
आगामी उन्हाळ्यात सिंचनाबरोबरच विविध प्रकल्प व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी संतुलित जलव्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे, असे सहायक अभियंता भावेश चौधरी यांनी सांगितले. धरणातील उपलब्ध पाणी संयमाने आणि वैज्ञानिक पद्धतीने वापरण्यावर विभागाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
पहिल्या आवर्तनानंतरही जलसाठा कायम राहण्याचा अंदाज
पहिल्या आवर्तनानंतरही हतनूर धरणातील उपलब्ध जलसाठ्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असा विभागाचा अंदाज आहे. दुसरे आवर्तन साधारणतः जानेवारी महिन्यात सोडण्याची तयारी असून त्यासाठीही आवश्यक नियोजन सुरू आहे.
