Join us
Daily Top 2Weekly Top 5

Chankapur Dam : चणकापूरचे आवर्तन सोडले; 45 दिवसांचा प्रश्न निकाली, चार तालुक्यातील नागरिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 12:32 IST

Chankapur Dam : जिल्ह्यातील चणकापूर व पुनंद धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले

नाशिक : जिल्ह्यातील चणकापूर व पुनंद धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले असल्याची माहिती मालेगाव पाटबंधारे विभागाने दिली आहे. चणकापूर धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे मालेगाव तालुक्यातील २२ दलघफू क्षमता असलेला शेवाळी नाला तलाव भरला जाणार आहे. त्यामुळे संबंधित गावांचा सुमारे ४५ दिवसांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ५ लाख लिटर क्षमतेची ढवळीविहीर साठवण टाकी भरल्यानंतर गावनिहाय टाक्यांत पाणी सोडले जाते, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे हरिश्चंद्र पानसरे यांनी दिली. नियोजनानुसार या धरणांमधून वर्षभरात पाच आवर्तने सोडण्याची तरतूद आहे.

या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात कोणत्याही परिस्थितीत जाऊ नये तसेच नदीकाठालगत असलेले पशुधन, शेतीपंप, साहित्य व इतर वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित शासकीय यंत्रणांनीदेखील याबाबत आवश्यक ती खबरदारी घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असे निर्देश मालेगाव पाटबंधारे विभागाने दिले आहेत.

पाणी पुरविण्याचे नियोजनउत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे असलेल्या गिरणा धरणातील जलसाठा ६ हजार ५४ दशलक्ष घनफूट असून धरण ३२.७२ टक्के भरले आहे. तसेच चणकापूर धरणातील जलसाठा १ हजार ९४ दशलक्ष घनफूट असून धरण ४५ टक्के भरले आहे. पुनंद प्रकल्पातील जलसाठा ९५१ लशलक्ष घनफूट असून ७२ टक्के भरलेले आहे. मालेगाव महापालिकेला पिण्यासाठी दरवर्षी साधारणपणे २०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित असते. धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होत असल्याने आरक्षित पाणी पावसाळा सुरू होईपर्यंत पुरविण्याचे नियोजन आहे.

चार तालुक्यांतील नागरिकांना दिलासामालेगाव शहराला गिरणा व चणकापूर या दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे येथे जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचते. चणकापूर धरणातून गिरणा नदीद्वारे ठेंगोडा डावा कालव्यातून पाणी महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावात येते. कळवण, देवळा, सटाणासह 3 मालेगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असून दुष्काळाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरापासून बहुसंख्य गावांतील विहिरींनी गाठलेला तळ यामुळे परिसरातील पाणीयोजना कोरड्या पडल्या असून पुनंद व चणकापूरच्या या आवर्तनाने पाणी योजनांना नवसंजीवनी मिळणार आहे.

५२ पाणीपुरवठा योजना अवबलंबूनमालेगाव तालुक्यासह 'कसमादे' परिसरात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. चणकापूर धरणावर मालेगावसह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. दुष्काळी परिस्थिती असली, तरी यंदा मागील वर्षाच्या तुलनेत चणकापूरसह विविध धरणांमध्ये साठा शिल्लक आहे. तथापि, वाढती थकबाकी ही योजनेच्या नियमित देखभाल, दुरुस्ती आणि भविष्यातील पाणीपुरवठ्यावर परिणाम करू शकते. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी थकीत पाणीपट्टी तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Release from Chankapur Dam Solves Water Issue for Four Talukas

Web Summary : Chankapur and Punand dams release water for drinking, resolving a 45-day water crisis. This benefits Malegaon and surrounding areas, replenishing water schemes. Citizens near Girna river are warned of potential flooding.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीधरणनाशिक