शिरीष शिंदे
बीड जिल्ह्यात यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात समाधानकारक जलस्थिती निर्माण झाली आहे. १५ जानेवारी रोजीच्या अधिकृत अहवालानुसार, जिल्ह्यातील लहान-मोठ्या एकूण १६७ धरणांमध्ये ८३.८७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. (Beed Water Storage Update)
त्यामुळे सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामासह पुढील उन्हाळ्याचे किमान चार महिने तरी जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचा दिलासादायक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. यंदा कोणत्याही भागात टँकर सुरू करण्याची वेळ येणार नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Beed Water Storage Update)
नेहमी टंचाई, यंदा मात्र दिलासा
बीड जिल्हा हा कायमस्वरूपी पाणीटंचाईग्रस्त म्हणून ओळखला जातो. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये टँकर सुरू होतात, हा आजवरचा अनुभव आहे. मात्र, यंदाचे वर्ष अपवाद ठरले आहे.
२०२५ च्या एप्रिल व मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे त्या काळातच पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर टळली. त्यानंतर जून-जुलैमध्ये काही काळ पावसाने उघडीप दिली असली, तरी ऑगस्ट व सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला.
विशेष म्हणजे, नेहमी कोरडा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर आणि आष्टी तालुक्यांतही जोरदार पाऊस झाल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आणि पिकांचे नुकसान झाले.
मात्र, दुसरीकडे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरली. एकीकडे पीकनुकसान असले, तरी पाणीसाठ्याच्या दृष्टीने ही परिस्थिती जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरली आहे.
पुढील उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध
सध्या जानेवारी महिना अर्ध्यावर आला असून, पुढील तीन ते चार महिने उन्हाळ्याचे असणार आहेत. तरीही या कालावधीत फारशी पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार जून अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय धरणांतील पाणीसाठा
जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील प्रकल्प आणि उपयुक्त पाणीसाठ्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे:
गेवराई : ७ प्रकल्प – ५५.०३८
शिरूर : ११ प्रकल्प – ९.९६७
पाटोदा : १३ प्रकल्प – २८.२९४
आष्टी : २९ प्रकल्प – १८.०६०
केज : १५ प्रकल्प – ६८.१०८
धारूर : ७ प्रकल्प – १९.९९८
वडवणी : १० प्रकल्प – १३.९७७
अंबाजोगाई : १२ प्रकल्प – ४४.५२४
परळी : १३ प्रकल्प – १५.९७४
माजलगाव : ४१.६२३
बीड : २४ प्रकल्प – ६०२.१५१ / २८६.५८८
एकूण : १६७ प्रकल्प – ६४५.५२१ उपयुक्त पाणीसाठा
विहिरी, बोअरला मुबलक पाणी
सद्यस्थितीत ग्रामीण भागातील विहिरी व बोअरवेलमध्ये भरपूर पाणी उपलब्ध आहे. पाणीपातळी लक्षणीयरीत्या वाढल्याने अनेक ठिकाणी बोअर घेताच पाणी लागत असल्याचे चित्र आहे.
धरणांलगत असलेल्या विहिरी व बोअरमध्येही समाधानकारक पाणी असल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोणत्याही भागातील धरणे कोरडी नसून पाण्याची पातळी स्थिर आहे.
थंडीमुळे बाष्पीभवन कमी
सध्या जिल्ह्यात थंडीचा कडाका असल्याने धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. दिवसा ऊन असले तरी तीव्रता कमी असून रात्री गारवा अधिक जाणवतो. सकाळी दहा वाजेपर्यंत ग्रामीण भागात गारठा जाणवत असल्याने पाणीसाठ्यावर सकारात्मक परिणाम होत आहे.
रब्बी पिकांसाठी अनुकूल स्थिती
दरवर्षी रब्बी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी कोणतीही अडचण नाही. परिणामी यंदा रब्बी पिकांचे उत्पादन चांगले होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
एकूणच, यंदा बीड जिल्ह्यातील पाण्याची स्थिती आशादायी असून, शेतकरी, नागरिक आणि प्रशासन सर्वांसाठी हा मोठा दिलासा ठरत आहे.
Web Summary : Beed district sees relief from water scarcity due to heavy rains, filling dams to 83%. Ample water is available for Rabi crops and summer, eliminating the need for tankers. Water levels in wells and borewells have also significantly increased.
Web Summary : भारी बारिश के कारण बीड जिले को जल संकट से राहत मिली, बांध 83% तक भर गए। रबी फसलों और गर्मी के लिए पर्याप्त पानी उपलब्ध है, जिससे टैंकरों की आवश्यकता नहीं है। कुओं और बोरवेल में भी जल स्तर काफी बढ़ गया है।