Join us

शेतकऱ्यांनो! इथं या, जमीन सुपीक करण्यासाठी मोफत गाळ घेऊन जा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 4:36 PM

धरणातील पाणी पातळी वाढविण्यासाठी नाशिक जलसमृद्ध अभियान राबविण्यात येत आहे.

नाशिक : धरणातीलपाणी पातळी वाढविण्यासाठी शिवाय धरण खोलीकरण वाढविण्यासाठी नाशिक जलसमृद्ध अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ गंगापूर धरण परिसरातुन गाळ काढून करण्यात आला आहे. शिवाय हा काढलेला गाळ ज्या शेतकऱ्यांना हवा असल्यास त्यांना मोफत दिला  जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपली जमीन सुपीक करण्यासाठी हा गाळ घेऊन जावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

यंदा सर्वदूर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर धरणातील पाणी पातळी देखील कमालीची खालावली आहे. अशा स्थितीत आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढवणे गरजेचे असल्याने नाशिक जिल्ह्यात  ‘जलसमृध्द नाशिक’ अभियान राबवण्यात येत आहे. साधारण १६ एप्रिल ते १५ जून या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत असून त्याचा शुभारंभ आज गंगावऱ्हे येथून म्हणजेच गंगापूर धरणापासून करण्यात आला. गंगापूर धरण गाळमुक्त करून शंभर लाख लिटरने त्याची क्षमता वाढवण्याचा संकल्प मृद व जलसंधारण विभागाने केला आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, मागील काळात सन 2018-19 मध्ये यवतमाळ व बुलढाणा येथे प्रशासन व लोकसहभागातून अशा प्रकारची कामे करण्यात आली आहेत. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये हे अभियान राबविताना आज सेवाभावी व इतर सर्व संस्था, नागरिक  यांची सढळ हाताने झालेली मदत पाहता या अभियानाची व्याप्ती येणाऱ्या काळात निश्चितच गती घेणार असल्याचे ते म्हणाले. भविष्यातील पाणीटंचाईची दाहकता दूर करण्यासाठी जलसमृद्ध नाशिक अभियानास सर्व स्तरावरून प्रतिसाद लाभत आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे प्रत्येक नाशिककराचे श्रम व स्वयंस्फूर्त योगदान या अभियानासाठी अतिमहत्वाचे ठरणार आहे. त्यातूनच हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे व्यक्त केला.

    शेतकऱ्यांनो गाळ घेऊन जा.... 

या अभियानात धरणांमध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ लोकसहभागातून काढला जाणार असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना हा सुपीक गाळ त्यांच्या शेतात टाकण्यासाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे. यातून मोठ्या जलाशयांची पाणीसाठवण क्षमता वृद्धीस लागून शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक होवून उत्पादनक्षमता वाढणार आहे. यासोबतच परत धरणांमध्ये गाळ साचू नये यासाठी जमिनीची होणारी धूप थांबविण्यासाठी व कमी करण्यासाठी नद्यांच्या उगमस्थानापासून विशेष प्रयत्न केले जाणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यातून काढलेला सुपीक गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वाहून नेण्याची जबाबदारी पार पाडावयची आहे. गाळ काढल्यामुळे या जलाशयाची पाणीधारण क्षमता निश्चितच वाढीला लागणार आहे.  

टॅग्स :शेतीहवामानधरणपाणीपाणी टंचाई