Join us

Mama Talav : मामा तलावाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:02 IST

Mama Talav : महाराष्ट्र शासनाने ब्रिटिशकालीन माजी मालगुजारी (Malguzari Talav) तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे.

Mama Talav :  महाराष्ट्र शासनाने ब्रिटिशकालीन माजी मालगुजारी (Malguzari Talav) तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहे. यात तलावांचे खोलीकरण करण्यात येत असून, पाळींची उंची वाढवली जात आहे. यामुळे तलावांच्या साठवण क्षमतेत वाढ होऊन पाण्याची पातळी वाढणार असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत होणार आहे. त्यामुळे शासनाने हाती घेतलेला हा उपक्रम एक क्रांतिकारी पाऊल ठरू शकतो.

गोंदिया जिल्ह्यातील (Gondia) एकूण ९२ गावे समाविष्ट असलेल्या सालेकसा तालुक्यात एकूण १७२ मामा तलाव आहेत. यावर्षी एकूण ३८ मामा तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे तर दोन तलाव गाळमुक्त केले जाणार आहेत. दहा-दहा तलावांच्या कामाचा टप्पा घेण्यात येत आहे. ज्या तलावांचे पाणी पूर्णपणे आटले आहे, त्यांचे काम आधी सुरू केले आहे.

प्रत्येक दहापैकी किमान सहा ते सात तलावांचे खोलीकरण आणि पाळ बांधणी, पाळीची उंची वाढवणे, काही ठिकाणी सुरक्षित गेट लावण्यात येत आहेत. तलावांचे खोलीकरणाचे काम त्या तलावासाठी दिलेल्या आराखड्यानुसार केले जात आहे. किमान दोन फुटांपासून एक मीटरपर्यंत खोलीकरण केले जात आहे. तलावाच्या खोलीकरणामुळे जलसाठा आधीपेक्षा दुप्पट होणार आहे. 

पाणीटंचाईवर मात करण्यास होणार मदतजलसाठा वर्षभर संग्रहित असल्यामुळे त्या गावातील बोअरवेल आणि विहिरींमध्ये पाण्याची पातळी कायम राहील. जनावरांसह वन्यजीव, पशु-पक्षी यांचेही विचरण तलाव परिसरात होत राहील. पाणीटंचाईची समस्या भासणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तलावाखालील असलेल्या शेतीला पाणी मुबलक प्रमाणात मिळू शकेल. त्यामुळे मामा तलावांचे पुनरुज्जीवन करणे हे शासनाचा एक क्रांतिकारी पाऊल आहे. 

मामा तलाव म्हणजे काय? विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हे चार जिल्हे 'मामा तलावांचे जिल्हे' म्हणून ओळखले जातात. याला कारण म्हणजे या चारही जिल्ह्यात असणारे 'मामा तलाव' अर्थात 'माजी मालगुजारी तलाव' (Malguzari) होय. पूर्वी या तलावांमध्ये पावसाचे पाणी साठवण्यात येत असे. तसेच या तलावांमधून हजारो हेक्टर शेतीस पिकांसाठी पाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात असे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीगोंदियाधरणकृषी योजना