Jayakawadi Dam : मागील अनेक वर्षात जूनमध्ये कधीही इतका मोठा क्युसेक पाणी जायकवाडीकडे (Jayakawadi Dam) नांदुरमध्यमेश्वरमधून झेपावले नव्हते. मात्र, यावर्षी नाशिक जिल्ह्यात (Nashik Rain) मुसळधार पाऊस झाल्यामुळे नांदुरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून १ ते ३० जूनपर्यंत १ लाख ५१ हजार २७७क्युसेक (१३ हजार ७५ दलघफू) पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले आहे.
नाशिक शहर व परिसरात जूनमध्ये कधी नव्हे तो यंदा विक्रमी ३६८.२ मिमी. इतका पाऊस पडला. मागील पाच वर्षांच्या आकडेवारीचा विचार केला असता सरासरीपेक्षा चौपटीने अधिक पाऊस यावर्षी शहरात जूनमध्ये झाला. सलग २५ दिवस पावसाचे राहिले. तसेच जिल्ह्यातसुद्धा यंदा जूनमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली असून, जलसंपदा विभागाच्या पर्जन्यमापकांनुसार एकूण १३,९११ मिमी. पावसाची नोंद झाली.
नाशिक शहरासह जिल्ह्यात यावर्षी पावसाचे धुमशान बघावयास मिळाले. बेमोसमी पावसासह मोसमी पावसानेही जोरदार हजेरी लावली. यामुळे बहुतांश धरणांचा जलसाठा पन्नाशीच्यापुढे सरकला आहे. मागील दहा वर्षामध्ये प्रथमच यंदा जूनमध्ये गोदावरी, दारणा, कडवा आदी नद्यांमधून धरणांचा विसर्ग सोडावा लागला.
यंदा २० जूनपासूनच विसर्ग
गोदावरी नदीला पुरसदृश स्थिती निर्माण झाली. यावर्षी जूनसह मे महिन्यातसुद्धा सर्वाधिक १८७मिमी. इतका पाऊस शहरात पडला. ५ जूनपासून ३० जूनपर्यंत शहरात पावसाचा जोर कमी अधिक फरकाने -टिकून राहिलेला पाहावयास मिळाला. मागील वर्षी ४ ऑगस्ट रोजी गंगापूर धरणातून गोदावरीत ६ हजार क्युसेकचा हंगामातील पहिला विसर्ग सोडण्यात आला होता. यावर्षी मात्र २० जूनपासूनच पहिला विसर्ग सुरू करावा लागला आहे.