Join us

भाटघर, नीरा देवधर, वीर अन् गुंजवणी धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणांत किती पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:37 IST

निरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा आजअखेर ४८ टक्के अधिक निर्माण झाला आहे. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

नातेपुते : निरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा आजअखेर ४८ टक्के अधिक निर्माण झाला आहे. त्यामुळे कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

निरा खोऱ्यात भाटघर, निरा देवघर, वीर व गुंजवणी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणातील पाण्यावर माळशिरस, सांगोला, पंढरपूर, फलटण, बारामती, पुरंदर, इंदापूर तालुक्यांतील शेती क्षेत्र अवलंबून आहे. या तालुक्यांसाठी ही धरणे वरदान ठरली आहेत.

निरा खोऱ्यातील भाटघर धरणात सध्या १७.६१३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. हे धरण ७९.२० टक्क्यांवर पोहोचले आहे. निरा देवघर धरणात ७.००५ टीएमसी पाणीसाठा असून, ते ५९.७२ टक्क्यांवर गेले आहे.

अधिक वाचा: आता राज्यातील प्रत्येक शेताला रस्ता मिळणार, शासन एक समग्र योजना आणणार; वाचा सविस्तर

वीर धरणामध्ये ८.२०९ टीएमसी पाणीसाठा असून, हे धरण सध्या ८७.२६ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. या धरणातून निरा डावा कालव्यात ६०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे तर निरा उजवा कालव्यात १ हजार २०४ क्युसेकने पाणी सोडले जात आहे.

गुंजवणी धरणात सध्या २.४०८ टीएमसी पाणीसाठा आहे. ६५.२७ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. या चारही धरणांतून ०६०१ टीएमसी पाणी सोडले जात आहे. चारही धरणांत मिळून ३६.२३७ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे.

एकूण पाणीसाठा ७४.९८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. गतवर्षी याच तारखेला या चारही धरणांत मिळून १३.०१८ टीएमसी पाणीसाठा होता. त्याची टक्केवारी २६.९४ होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४८ टक्के अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

निरा डावा कालव्यात ६०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे तर निरा उजवा कालव्यात १ हजार २०४ क्युसेकने पाणी सोडले जात आहे.

धरणांमध्ये पाणी; पण पावसाची दडीनिरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा सध्या समाधानकारक आहे. परंतु, धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भागात पावसाने दडी मारली आहे. राज्याच्या अन्य भागांत धो-धो कोसळणारा पाऊस माळशिरस, सांगोला, पंढरपूर, फलटणला हुलकावणी देत आहे. धरणातील पाणी कालव्याद्वारे मिळत असले तरी त्याला मर्यादा आहेत. पावसाने साथ दिली तर विहिरी, कूपनलिका यांची पाणीपातळी वाढते. त्यामुळे या भागात पावसाची अत्यंत गरज आहे.

अधिक वाचा: शेतकऱ्यांची उसाची बिलं कारखान्यांनी दिली नाहीतर केली जाणारी आरआरसी कारवाई म्हणजे काय? वाचा सविस्तर

टॅग्स :धरणपाणीपाऊसशेतकरीशेतीपीक