Join us

बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये काठावर निभावले, सप्टेंबरमध्ये बक्कळ पाऊस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 19:32 IST

बुलढाणा जिल्ह्यात तीन महिन्यांत सरासरीच्या १४ टक्के अधिक पाऊस होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

नीलेश जोशीसिंचनाच्या जिल्ह्यात मर्यादित सुविधा असल्याने मान्सूनच्या पावसावरच जिल्ह्यातील शेती अवलंबून असून ऑगस्टमध्ये पावसाची ३.५१ टक्के तूट असून १४ मंडळांमध्ये ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जेमतेम सरासरीच्या आसपास जिल्ह्यात पाऊस झाला.

मात्र सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज जिल्हा कृषी हवामान केंद्राने व्यक्त केला असून आधीचे तिन्ही महिन्यांचे अंदाज अचूक आल्याने सप्टेंबरमध्ये खरोखरच सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसल्यास रब्बी हंगामातील पाण्याचीही समस्या निकाली निघण्यास मदत होणार आहे.

भारतीय हवामान खात्याने ३१ ऑगस्ट रोजी दीर्घावधीसाठी हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रामुख्याने हिंद महासागर, प्रशांत महासागर व अरबी समुद्राच्या भूपृष्ठावरील तापमान हे सप्टेंबरमधील पावसासाठी सकारात्मक अवस्थेत असल्याने हा पाऊस होण्याची शक्यता जिल्हा कृषी हवामान खात्यातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात साधारणतः १८ दिवस पाऊस पडत असतो. सरासरी १२०.५ मिमी एवढी पावसाची नोंद या महिन्यात होत असते. यापेक्षा अधिक पाऊस जिल्ह्यात यंदा सप्टेंबरमध्ये पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे

कोणत्या महिन्यात किती पाऊस पडला

जून - सरासरीच्या ३० टक्के अधिक

जुलै - सरासरीच्या २४ टक्के अधिक

ऑगस्ट -  सरासरीच्या तुलनेत ३.५१ टक्के कमी

या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला वेग येऊ शकतो व रब्बी हंगामातील लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊ शकते. - मनेष यदुलवार, कृषी हवामान तज्ज्ञ जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा

सोयाबीन पीक परिपक्व अवस्थेत यायला अजून एक महिन्याचा कालावधी बाकी आहे, पावसाचे पूर्वानुमान पाहता शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेऊन कापणीचे नियोजन करावे. -डॉ. अनिल तारू, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा

तीन महिन्यांत सरासरी ६१४.६ मिमी पाऊस; जिल्ह्यात सरासरी ओलांडली!

जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत ५३८.९ मिमी सरासरी पाऊस होणे अपेक्षित असते. यंदा मात्र प्रत्यक्षात तो ६१४.६ मिमी बरसला आहे. परिणामी  बुलढाणा जिल्हा महिन्यांची पावसाची सरासरी पहाता १४ टक्क्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात पाऊस अधिक पडला आहे.

जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात ६४३.८ मिमी पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या तो ८४.५३ टक्के आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसशेतकरीशेती