कधी गारवा तर कधी उन्हाचे चटके असे वातावरण मागील काही दिवसांपासून जाणवत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १ तारखेपासूनच कमाल तापमानाने ३६ अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे.
येत्या काळात देखील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्याचे वातावरण पाहता दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. मात्र, अद्याप उकाड्याला सुरुवात झाली नाही.
येत्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडीफार थंडी आहे ती जाऊन उकाड्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण भारतभर उन्हाच्या झळा जाणवणार असून किमान व कमाल तापमान सरासरीहून अधिक तापमान राहणार आहे.
मागील आठवड्यापासून थंडी कमी झाली असून पहाटे हलका गारवा आणि दुपारी उन्हाचे चटके बसू लागले आहेत. पॅसिफिक महासागरात सध्या ला नीना सक्रिय असून समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीहून जास्त आहे.
एप्रिलपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून त्यानंतर याचे परिणाम कमी होण्यास सुरुवात होईल. संपूर्ण देशातील हवामानावर याचा परिणाम होतो आहे. फेब्रुवारी महिन्यात याचा परिणाम पाहायला मिळणार आहे.
मागील वर्षीपेक्षा यावर्षी उकाडा अधिकची शक्यता२०२४ च्या तुलनेने २०२५ मध्ये उकाडा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी दोन अंश सेल्सिअसने तापमान जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी मागील वर्षीपेक्षा अधिक उकाडा जाणवतो की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे.