Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तापमान कसे राहील? त्यानुसार पिकांची काळजी कशी घ्यायची? वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 17:05 IST

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात २३ नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अंशाने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 17 ते 23 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त तर दिनांक 24 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 22 ते 28 नोव्हेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे, तर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.  

पीक व्यवस्थापनजोमदार वाढीसाठी हरभरा पिक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली कोळपणी करावी.  

करडई पिकात उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करावी व दोन रोपातील अंतर 20 सेंमी ठेवावे. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्यात. बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. गव्हाची पेरणी करतांना 154 किलो 10:26:26 + युरिया 54 किलो किंवा 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 53 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ‍किंवा 87 किलो युरिया + सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. राहिलेले अर्धे नत्र 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे. 

पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात लवकर संपवावी. ऊस लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26  किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश  किंवा 65 किलो युरिया + 531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.  

पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागेचे व्यवस्थापनपुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या डाळींब व चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या डाळींब व चिकू फळांची काढणी करून घ्यावी.

भाजीपालापुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून  आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता असल्यास पुनर्लागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मिली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेतीपुढील सात दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.  काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

तुती रेशीम उद्योगलहान व मध्यम भुधारक शेतकऱ्यांनी संसाधन उपलब्धतेनुसार शेतीचे नियोजन व त्याची मलबजावणी योग्य करावी. शेती पडीत ठेवू नये, अर्धा किंवा एक ते दीड एकर तुती पट्टा पध्दतीने लागवड केली तर वर्षासाठी बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेत माहिती घेऊन जिल्हा रेशीम कार्यालयात या महीण्यात आपली नोंदणी करावी व जानेवारी महिण्यापर्यंत तुती रोपवाटीका लागवड करावी जेणेकरून जुन महिण्या पर्यंत रोपे 3.5 ते 4 महिण्याचे झाल्यानंतर शेतात लागवड करता येतील. जमीन तयार करून एकरी 8 टन शेणखत दोन हप्त्यात जुन व नोव्हेंबर महिण्यात 4 ते 8 टन प्रत्येकी या प्रमाणे द्यावे.

पशुधन व्यवस्थापनपशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पिके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरिया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. इत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.

सौजन्य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

टॅग्स :रब्बीपीक व्यवस्थापनशेतकरीशेतीदुग्धव्यवसायफुलशेती